पनवेलकरांवर मताधिक्याची  जबाबदारी

उदयोगमंत्री  सुभाष देसाई यांचे मत

शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा संपन्न

पनवेल/प्रतिनिधी- उरणला आपला आमदार आहे ,त्याचबरोबर कर्जतमध्येही पक्षाची चांगली स्थिती आहे. त्यामुळे पनवेलकरांची जबाबदारी आनखी वाढली आहे. या ठिकाणी शिवसेनेला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचे प्रयत्न पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी करावे असे आवाहन उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. पनवेलमधील अशोका सभागृहात मावळ लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार श्रीरंग बारणे, संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याला आमदार मनोहर भोईर, किशोरीताई पेडणेकर, रेखाताई ठाकरे,  शशांक कामत,अनिल चव्हाण जिल्हा सल्लागार बबन पाटील, रमेश गुडेकर, जिल्हा प्रमुख शिरिष घरत, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका संघटक भरत पाटील, महानगर संघटक प्रथमेश सोमण  यांच्यासह पदाधिकारी  उपस्थित होते.  

सुभाष देसाई पुढे म्हणाले की पनवेल आणि शिवसेनेचा संबध आज कालचा नाही तर चाळीस वर्ष जुना आहे. या शहराची ओळख जुनी असून येथे शिवसेनेच्या नगरसेवकांनी चांगले काम केलेले आहे.अगामी काळातही पदाधिकाऱ्यांनी  चांगले काम करावे असे आवाहन उदयोगमंत्र्यानी केले.पाच राज्यातील निकालावरून भाजपमधील आमदारांची चलबिचल सुरू झाली आहे. अगामी निवडणुकीत त्यांच्या सर्व खुर्च्या खाली असतील असा टोलाही त्यांनी लगावला.आता गुलाल उसणवारी चालणार नसून शिवसेने शिवाय दुसरा सक्षम पर्याय नसल्याचे मतही देसाई यांनी व्यक्त केले. तेलंगणा आणि मिझोरमच्या निकालाचा दाखल देत ते म्हणाले की प्रादेशिक पक्षाला तेथील जनतेने स्विकारले आहे.राष्ट्रीय पक्ष त्या भूमीत भुईसपाट झाले असून महाराष्ट्रात सुध्दा तीच स्थिती निर्माण होईल असे भाकीत वर्तवत  स्थानिकाच्या हक्काचा शिवसेना शिवाय दुसरा पक्ष नसल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

पदाला न्याय देता येत नसेल तर पदमुक्त व्हा

संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांनी झाडाझडती घेत जर पदाला न्याय देता येत नसेल तर त्यांनी पदमुक्त व्हा अशा सुचना त्यांनी दिल्या.पनवेल महानगरपालिकेची अपयशामुळे जखम झाली आणि त्याचे व्रण हृदयावर कोरले आहेत.आम्हाला फसवा पण पक्षाला फसवु नका अशी भावनिक साद दळवी यांनी घातली. हेवे दावे न करतात, कोण काय करतय या पेक्षा आपण पक्षाकरीता काय करू शकतो याचा विचार करा असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईतून आलेल्या शिवसैनिकांना सामावून घ्या 

मुंबईतुन  मोठया प्रमाणात शिवसैनिक  पनवेल परिसरात  राहण्यासाठी आलेले  आहेत.त्यांना पक्षात  सामावून घ्या,आपली  मक्तेदारी मोडू नये म्हणून कोणाला  डावलू नका  असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.