रायगडमधील काँग्रेसची स्वबळाची भाषा

जनसंघर्ष यात्रेत पक्षनेतृत्वाकडे धरला आग्रह

पनवेल/प्रतिनिधी- अगामी विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात कोणासोबतही आघाडी करू नका आम्ही यश मिळवू असे जाहिरपणे सांगत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाची भाषा केली. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने पक्षनेतृत्वाकडे याविषयही आग्रह धरण्यात आला.प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनीही रायगडात कोणीही आम्हाला गृहीत धरू नये असा एक प्रकारे इशारा दिल्याने काहीप्रमाणात स्थानिक नेत्यांच्या जिल्ह्याती एकला चलो रेच्या  मागणीला वजन प्राप्त झाले आहे.

रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झालेली आहे. हे दोनही पक्ष रायगड जिल्ह्या परिषदेत सत्तेत आहेत.अगामी लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर मावळ व रायगड हे दोनही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटयावर आहेत. त्यामुळे साहजिकच येथे शेतकरी कामगार पक्षाकडून घडयाळाला चावी मिळणारच . या निवडणुकीत काँग्रेसही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे काम करेल. मात्र विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्यात तीन पक्षातील आघाडीबाबत आगोदरच गुंतागुत निर्माण झाली आहे. एकूण सात विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या चार विधानसभा मतदारसंघावर शेकाप दावा सांगून आहे. कर्जत आणि श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटयावर आहे. फक्त महाड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळू शकतो.रायगड जिल्हयात काँग्रेस ताकत असताना फक्त एकच जागा दिली जात असेल पक्षाने काय इतरांच्या सतरंतज्या  उचलायच्या का असा प्रश्न स्थानिक पदाधिकारी उपस्थित करीत आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा रायगडमधील आघाडीला विरोध आहे. त्याचबरोबर नवनियुक्त रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप यांनीही पनवेल येथील सभेत सातही मतदारसंघात काँग्रेस पक्ष जिद्दीने लढेल अशी ग्वाही पक्षनेतृत्वाला दिली. कामगार नेते महेंद्र घरत यांनी विरोधी आणि मित्र पक्षाकडून काँग्रेस कुठे आहे ? अशी वल्गना केली जात असल्याची खंत व्यक्त केली. त्यांना उत्तर देण्याकरीता रायगडात आघाडी करू नका आम्ही पक्षाची पनवेल आणि उरणमध्ये ताकत दाखवून देवू असे मत राज्यातील बडया नेत्यांसमोर मांडले.पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर.सी घरत यांनी सुध्दा पनवेल आणि उरण आणि जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघात पक्षाला स्वबळावर यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनीही आपल्या मनोगतात हाच आशय मांडला.

नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जर या भागातील टोल बंद करायचे असतील, पनवेलला मुबलक पाणी पाहिजे असेल आणि या परिसरातील नैसर्गिंक गरजेपोटी बांधण्यात आलेले घरे कायम करायचे असेल तर काँग्रेसशिवाय  पर्याय नसल्याचे सांगत स्थानिक पदाधिकाऱ्यांना एक प्रकारे बळ दिले. माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यापुर्वी पनवेलला काँग्रेसच्या सभा झाल्या पण त्या २०१४ पुर्वी. त्यानंतर पक्ष काही प्रमाणात अडचणीतून गेला. मात्र आता काँग्रेस पक्ष या भागात हाऊसफुल झाला असल्याचे सांगत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.