रायगडात नगण्य असलेला भाजप आता अग्रगण्य

पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्षांची किमया

माजी मंत्री रवीशेठ पाटील यांचा पक्षप्रवेश

नाना करंजुले

पनवेल/प्रतिनिधी- रायगडात अनेक वर्ष नगण्य  असलेल्या भारतीय जनता पक्षाने गेल्या साडे चार वर्षात ताकत वाढवली आहे. मंगळवारी  रात्री काँग्रेसचे माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या पक्षप्रवेशाने भाजपची ताकत आनखी वाढली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांची  ही किमया मानली जाते. अगामी  विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्यात पक्षाला चांगला फायदा होईल असे मत राजकिय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

रायगड जिल्हयाच्या राजकारणाता मागोवा घेतला तर  शेकाप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष होते.काँग्रेसने सातत्याने शेकापला शह दिला. बँ.ए.आर अंतुले यांच्या रूपाने या  जिल्ह्याने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिले. त्यानंतर सुनिल तटकरे राजकारणात पुढे आले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात स्थान सुध्दा मिळाले. तेव्हापासून तटकरे यांनी मागे पाहिलेच नाही. आजच्या घडीला  शेकापबरोबर घडयाळाची आघाडी आहे. तसेच काँग्रेस पक्ष सुध्दा आघाडीबरोबर जाईल असे चित्र आहे. शिवसेनेचे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. तसेच मावळ आणि रायगडमध्ये पक्षाचे खासदार आहेत. एकंदरीत  शेकाप- राष्ट्रवादी आघाडी विरूध्द शिवसेना असे जिल्ह्यात वातावरण पाहायला मिळाले. काँग्रेसची जिल्ह्यात दखलपात्र ताकत आहे. मात्र यामध्ये २०१४ पर्यंत भारतीय जनता पक्ष  कुठेच नव्हता. पनवेल नगरपालिकेत दोन ते तीन नगरसेवक वगळता पक्ष ग्रामीण भागात दिसत नव्हता. महेश बालदी यांच्यामुळे उरण शहरात भाजपचे अस्तित्व काही प्रमाणात होते. परंतु इतर ठिकाणी कमळाचे अस्तित्वच  नव्हते. मात्र मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी  प्रशांत ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पनवेलमध्ये पारडे जड झाले. त्यांच्या रूपाने जिल्ह्यालाच काय तर कोकणाला आमदार मिळाला. काही महिन्यातच आ. ठाकूर यांच्यावर रायगड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी संघटनात्मक बांधणी केली. नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना बळ  दिले. काही ठिकाणी यश सुध्दा आले. उरण नगरपालिकेवर एक हाती सत्ता भाजपची आली. गेल्या चार वर्षाचा विचार करता  रायगड जिल्हयात भाजपचे कमळ खऱ्या अर्थाने दिसायला लागले आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविंद्र चव्हाण यांच्याकडे  रायगडचे पालकत्व दिले. त्यानंतर चव्हाण आणि ठाकूर या जोडीने जिल्हा पिंजून काढला. मोठया प्रमाणात इतर पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश सुध्दा दिला. कर्जत –खालापुर मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम त्यांच्या गळाला लागले. ते भाजपवासीय झाल्याने साहजिकच येथे पक्षाची ताकत वाढली. एकेकाळी शिवसेनेचे विधानसभेतील पक्षप्रतोद असलेले साटम यांच्यामुळे भाजपला  संघटनात्मक बळ आले आहे. त्याशिवाय सिडकोचे माजी संचालक वसंत भोईर यांना सुध्दा पक्षात घेवून पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांना शह दिला. नुकत्याच पार पडलेल्या कर्जत नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून. राष्ट्रवादीला पराभूत करीत रायगडात एक प्रकारे परिवर्तनाचा संदेश दिला.पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघात पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरूच आहेत.

रविशेठ पाटील यांच्यामुळे ताकत वाढली

काँग्रेस सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री राहिलेल्या रवीशेठ पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांनी महत्वाची भूमिका बजावलीच. त्याचबरोबर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनीही याबाबत पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे.