खड्डयांना सिडको अधिकाऱ्यांचे  ‘पद’नामकरण

कामोठेकरांनी केले आनोखे आंदोलन

एकता सामाजिक सेवा संस्थेचा पुढाकार

पनवेल/प्रतिनिधी – कामोठे वसाहतीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना होत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे एकता सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून कामोठेकरांनी खड्डयांना सिडकोच्या अधिकाऱ्यांचे पदनामे देवून रविवारी अनोखे आंदोलन केले. या नामकरणाची चर्चा पनवेल परिसरात सुरू आहे. यातुन तरी अधिकाऱ्यांनी बोध घ्यावा अशा प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी नोंदवल्या आहेत.

कामोठे नोडमधील अंतर्गत रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. सेक्टर२१ येथील विस्टा कॉर्नर जवळ तर ‘रस्त्यात खड्डे की आहे की खड्डयात रस्ता असा’ प्रश्न पडतोय .हीच अवस्था थोडया फार फरकाने इतर ठिकाणी आहे. काही सेक्टरमध्ये केबल, वाहिन्या टाकण्याकरीता खोदकाम करण्यात आले आहे. त्याकरीता संबधित कंपन्यांकडून सिडकोने डॅमेज चार्ज सुध्दा घेतलाय. परंतु ज्या ठिकाणी खोदकाम झाले आहे तिथे रस्ता पुर्ववत करून देण्यात आलेले नाही. काही रस्त्यावर फक्त थुकपट्टी करून ठेकेदार आणि सिडको बाजुला झाली आहे. पावसाळयात पुन्हा चाळण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याबाबत सिडकोकडे अनेकांना विनंती अर्ज केले. परंतु प्राधिकरणाकडून अश्वासना पलिकडे काहीच करण्यात आले नाही.एकता सामाजिक संस्था व स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक संस्थेकडून वेळोवेळी सिडको कडे पाठपुरावा करण्यात आला होता. सिडको ने टेंडर काढून काही ठिकाणी तात्पुरते काम केले पण बऱ्याचशा जागी खड्डे तसेच ठेवले असल्याचे कामोठेकरांचे म्हणणे आहे.सिडकोच्या याच अडमुठे धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी एकता सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी नोडमधील खड्डयांना सिडकोच्या अधिकाऱ्यांची पदनामे देण्यात आली. त्या त्या ठिकाणी व्यवस्थापकिय संचालकांपासून ते कनिष्ठ अभियंत्यापर्यंतचे पदनामे ब्रशव्दारे रेखाटण्यात आले. आंदोलनाबाबत सिडकोला पुर्वकल्पना देवूनही तिथे कोणीच फिरकले नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये अमोल शितोळे, अल्पेश माने, जयकुमार डिगोळे, अशितोष सोनवणे, प्रशांत मिश्रा, मंगेश अढाव, संतोष चिखलकर, स्वप्नील काटकर यांनी सहभाग नोंदवला.

“सिडको प्राधिकरणला सर्वसामान्य नागरिकांचे काहीच कसे पडले नाही असा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. कामोठे वसाहतीत रस्त्याची अवस्था बिकट असल्याने गेल्या वर्षभरापासून आमचा पत्रप्रपंचा सुरू आहे. असे असतानाही कामे करू हे म्हणण्या पलिकडे काहीच हालचाल होत नाहीत. त्यामुळे आम्ही काल सिडको अधिकाऱ्यांचे पदनामे देवून प्राधिकारणाच्या कारभाराचा निषेध नोंदवला.”

अमोल शितोळे

अध्यक्ष एकता सामाजिक संस्था

कामोठे