आदित्य म्हसकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला 

तिघा मारेकरांना ठोठवली जन्मठेप

अलिबाग सत्र न्यायालयाचा निकाल  

पनवेल /प्रतिनिधी  पनवेल आकुर्ली येथील आदित्य सखाराम म्हसकर हत्येप्रकरणीचा निकाल अलिबाग सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणातील आरोपींना दोषी धरून  तिघांना जन्मठेपीची शिक्षा सुनावला आहे. त्यामुळे पाच वर्षानंतर का होईना आदित्यला न्याय मिळाला आहे.

पनवेल तालुक्यातील आकुर्ली गावातील सखाराम राजाराम म्हसकर यांचा १७ वर्षीय मुलगा आदित्य हा दि . २३ जून २०१३ रोजी घरातून आईसाठी औषध आणण्याकरिता बाहेर पडला होता . मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही . रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याचे वडील सखाराम म्हसकर यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार दाखल केली  होती  . तीन दिवसानंतर  चिपळा येथील  डोंगरावरील झाडीत आदित्यचा मृतदेह सापडला . त्याच्या डोक्याला गंभीर दुखापती होत्या आणि गळ्यातील ५ तोळे वजनाची सोन्याची चैन मोबाईल चोरीला गेल्याने हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असल्याची पोलिस तपासात निष्पन्न झाले.  त्यानंतर  याप्रकरणी भा . दं . वि . कलम ३६४ ३९७ ३०२ २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . या हत्येप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी आकुर्ली गावातील रुपेश उर्फ भुऱ्या काकडे शोएब अली आणि निलेश म्हसकर यांना अटक केली . तपासाअंती या तिघांविरोधात अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले . या  खटल्याची सुनावणी  अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर . जी . असमार यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षाच्या वतीने  विशेष शासकीय अभियोक्ता प्रसाद एस . पाटील आणि  अॅड . अश्विनी बांदिवडेकर यांनी काम पाहिले. यामध्ये एकूण २३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली . दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे विचारात घेऊन न्यायालयाने तीनही आरोपींना  आदित्य म्हसकर याच्या खूनप्रकरणी दोषी ठरवले. त्यांना  खून केल्याप्रकरणी आजन्म सश्रम कारावास आणि प्रत्येकी १ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास ३ वर्षे साधी कैद सुनाविण्यात आली. त्याचबरोबर इतर कलमार्तंगत सुध्दा शिक्षा सुनाविण्यात आली. या खटल्याकडे पनवेल परिसरातील विशेषतः आकुर्ली विहीघर हरिग्राम परिसरांतील लोकांचे लक्ष लागून राहिले होते .

दंडाची रक्कम म्हसकर कुटुंबियांना देण्याचे आदेश  

आरोपींकडून दंडाची रक्कम वसूल झाल्यास ३ लाख रुपये रक्कम मयत आदित्य म्हसकर याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत . या खटल्याकडे पनवेल परिसरातील विशेषतः आकुर्ली विहीघर हरिग्रामपरिसरांतील लोकांचे लक्ष लागून राहिले होते .