दादा काळजी करू नका! पार्थ आमचाही मुलगा

शेकाप नेते जयंत पाटील यांची अजित पवार यांना ग्वाही

शरद पवार यांच्या उपस्थितीत  पिंपरी चिंचवडमध्ये पहिला सभा संपन्न 

पिंपरी/प्रतिनिधी- दादा तुम्ही  खाली येवू नका ते आमच्यावर सोडा, काळजी करू नका पार्थ आमचाही मुलगा आहे. त्या भावनेतून काम करून जास्तीत जास्त मताधिक्य देवू अशी ग्वाही शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे दिली. पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

पार्थ पवार यांना उमेदवारी दयावी आम्ही बिनशर्त पाठिंबा देवू अशी आग्रह शेकापचे नेते जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे धरला होता. उमेदवारी जाहिर झाल्यानंतर पहिली प्रचार सभा रविवारी  सायंकाळी पिंपरी चिंचवड येथे  पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसेपाटील, मदन बाफना, आमदार बाळाराम पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शेकाप आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात पिंपरी चिंचवडचा कायपालट हा अजित पवार यांनी केला असल्याचे सांगितले. दादा येथे आल्यानंतर आम्हाला युरोपमध्ये आल्यासारखे वाटते असे सांगतात टाळयांचा कडकडाट झाला. मावळ लोकसभा मतदारसंघात आम्ही मागच्या वेळी उमेदवार उभा केला होता. त्यावेळी पंचवीस हजारांचे लीड दिले असल्याची आठवण शेकापचे सरचिटणीस  जयंत पाटील यांनी उपस्थितांना करून दिली.आज आमच्याकडे जिल्हा परिषद सदस्य आहेत, सरपंच त्याचबरोबर महापालिकेत नगरसेवक आहेत. वेगवेगळया सामाजिक, शैक्षणिक, सहकारी संस्था आहेत. ही सर्व ताकत पार्थ पवार यांच्या पाठीमागे उभी करू अशी  ग्वाही त्यांनी दिली. ते केवळ राष्ट्रवादीचेच नाही तर शेकापाचे उमेदवार आहेत या भावनेतून आमचे कार्यकर्ते काम करतील असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.  पार्थ जास्त मतांनी निवडूण आले की तो खरा विजय, कमी मतांनी जिंकले तर तो आमचा पराभव आहे समजू असेही आ.जयंत पाटील यांनी जाहिरपणे सांगितले. दादा तुम्ही घाटाखाली येवू नका तुम्ही वरचा भाग सांभाळला कारण पार्थ हा आमचाही मुलगा आहे असे सांगण्यास शेकापचे सरचिटणीस विसरले नाहीत.

शेकापचे अभिनंदन करावे तितके कमीच

अजित पवार यांनीही आपल्या भाषणात शेतकरी कामगार पक्षाने दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याचे अभिनंदन केले. आमदार जयंत पाटील, माजी आमदार विवेक पाटील, शिक्षक आमदार बाळाराम पाटील, प्रितम म्हात्रे  पनवेल, उरण आणि खालापुर पट्टयात चांगले काम करीत असल्याचे पवार म्हणाले.