रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे कळंबोलीत स्वागत होणार

सोमवारी भाजप प्रवेशाकरीता मुंबईत येणार

मुंबई /प्रतिनिधी- माढा लोकसभा मतदारसंघात दबदबा असलेले काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर सोमवारी  भाजपात प्रवेश करणार आहेत. ते या मतदारसंघातून युतीचे संभाव्य उमेदवार मानले जातात. त्यांचे सातारास्थित पनवेलकर कळंबोलीत स्वागत करणार आहेत. तसेच नवी मुंबईत सुध्दा नाईक निंबाळकर यांना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.

नाईक निंबाळकर यांचा सातारा जिल्ह्यातील माण, खटावस फलटण या माढा मतदार संघात येणाऱ्या तालुक्यांत मोठा प्रभाव आहे. याच कारणामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माढ्यातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यास  त्यांचा संजय शिंदे यांच्याशी थेट मुकाबला होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे अतिशय निकटवर्तीय असलेल्या रणजिसिंह नाईक निंबाळकर हे कृष्णखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते . २३ मार्च रोजी त्यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण  यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सातारा व माढा या दोनही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यामुळे त्यांच्यासह समर्थकांच्या  मनात नाराजी होती. तसेच गेली दहा वर्ष लोणंद- फलटन- बारामती हा रेल्वेप्रकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हेतुपुरस्सर रखडवला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दोन पिढया पाठपुरावा करूनही नीरा-देवघर हा जलसिंचन प्रकल्प झाला नसल्याची खंत व्यक्त करून  त्याकरीता आडकाठी घालण्यात आली  असल्याचा उल्लेखही नाईक निंबाळकर यांच्या राजीनामापत्रात  आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग मुंबई, नवी मुंबई व पनवेल परिसरात वास्तव्यास आहे . सोमवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याकरीता मुंबईत येणार आहेत. त्यानिमित्ताने कळंबोली येथे सातारावासीयांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

“रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यात सर्वसामान्यांकरीता संघर्ष केला आहे. ते खऱ्या अर्थाने लोकनेतृत्व आहे. आमच्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचा भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय अतिशय योग्य असल्याचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे  म्हणणे  आहे. आम्ही भावी खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहतो.सोमवारी कळंबोली येथे नाईक निंबाळकर यांचे स्वागत करण्याचे प्रयोजन आहे.”

प्रशांत रणवरे

युवा कार्यकर्ते भाजप

कळंबोली