दिलीप गांधीचे बंड होणार थंड ?

राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

पालकमंत्र्यांकडूनही मनधरणीचे प्रयत्न सुरू

नाना करंजुले 

मुंबई /प्रतिनिधी –खासदार दिलीप गांधी यांचे तिकिट कापून त्या ठिकाणी सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे  त्यांचे  चिरंजीव सुवेंद्र हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर येथे जावून दिलीप गांधी यांची भेट घेतली. तसेच पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनीही तुम्ही  गांधीची काळजी करू नका ते माझ्यावर सोपवा असे जाहीरपणे सांगितल्यामुळे त्यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे बंड क्षमण्याची चिन्ह दिसू लागले आहेत.

दिलीप गांधी हे तीन टर्म खासदार आहेत. तसेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. नगरच्या राजकारणात त्यांनी आपला प्रभाव निर्माण केला आहे. परंतु यावेळी सुजय विखे भाजपमध्ये आल्याने गांधी यांच्याऐवजी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे त्यांचे समर्थक नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर विखे यांचे काम न करता निष्ठावंत म्हणून अपक्ष निवडणुक लढविण्याची घोषणा सुवेंद्र गांधी यांनी केली होती. नगर दक्षिणमध्ये जैन समाजाचही दखलपात्र मतदान आहे. खासदार दिलीप गांधी यांच्या रूपाने समाजाचा एक प्रतिनिधी संसदेत होता. मात्र भाजपने उमेदवारी न दिल्याने समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याबाबत बैठका सुध्दा घेण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना निवडणुक रिंगणात उतरवल्यामुळे काटे की टक्कर होणार आहे. त्यामुळे गांधी यांचे बंड भाजपला न परवडणारे आहे. त्याचबरोबर मोठा संघर्ष करून नवी इनिंग सुरू करीत असलेल्या आपल्या मुलाच्या दृष्टीकोनातून गांधी यांची नाराजी योग्य नसल्याचे महाराष्ट्रातील हेवी वेट नेते राधाकृष्ण विखे पाटील हे ओळखणार नाही तर नवलच . त्यामुळे काँग्रेसचे स्टार प्रचारक असतानाही त्यांनी बुधवारी दिलीप गांधी यांची घरी जावून भेट घेतली. बंद दरवाजा आड या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. आपण भाजप उमेदवाराचा प्रचार करू तसेच  सुवेंद्र यांचीही समजुत काढण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी विखे पाटील यांना सांगितल्याचे समजते.

प्रा.राम शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरू 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर दक्षिणची जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी येथील पालकत्व  आपले मंत्रीमंडळातील विश्वासु सहकारी नगरचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्यावर दिली आहे. गांधी आणि शिंदे यांचे संबध अतिशय चांगले आणि मैत्रीपुर्ण आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही दिलीप गांधी यांची  काळजी करू नका ते माझ्यावर सोडा आणि कामाला लागा असा सुचना त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. ते सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास जाणवत होता. त्यामुळे गांधी यांचे बंड क्षमण्याची चिन्ह दिसू लागले आहेत.