कामोठेत मतदारांना चारशे रूपयात खरेदीचा घाट

युतीच्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा डाव उधळला

दोन व्यक्तींना पोलीसांनी घेतले ताब्यात

पनवेल/प्रतिनिधी- कामोठे वसाहतीत मतदारांना चारशे रूपये देवून एक प्रकारे खरेदी करण्याचा घाट घालण्यात आला होता. परंतु शिवसेना- भाजपच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी हा डाव उधळून लावला. पैसे वाटणाऱ्या त्या  दोघांना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.  त्यांचेकडे मतदारयादी, मतदारांच्या नावाच्या चिठ्ठ्या व  ११,९०० रूपयांची रोख  रक्कम  आढळली आहे. पार्थ पवार यांना मतदान करण्यासाठी मतदारांना पैशाचे अमिष दाखविण्यात आले  असल्याची तक्रारी भरारी पथकाचे प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी कामोठे पोलीस ठाण्यात दिली आहे.

वैभव विठोबा पाटील वय ३४वर्षे, संदिप रामकृष्ण पराडकर, (३१)दोघेही राहणारे कामोठे असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे डिलव्हरी बाँयचे काम करीत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. कामोठे से.१४ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून मतदारयादी व मतदारांच्या नावाच्या चिठ्ठ्या  यादिप्रमाणे वाटप करण्याचे या दोघांना देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीवरून निष्पन्न झाले आहे. सेक्टर-३६ येथील सत्यकुंज सोसायटी राहणाऱ्या १७ मतदारांची हाताने लिहिलेले नावे त्यांच्याकडे होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणुक चिन्ह फोटो नाव असलेली चिठ्ठयाही सापडल्या. याबाबत  सेना भाजप कार्यकर्त्यांना कुणकुण लागल्याने हा प्रकार त्यांनी उघडकीस आणला. शनिवारी सायंकाळी प्रचार संपला त्याच दरम्यान हे पैसे वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. या प्रकारणाची अधिक चौकशी पोलीस उपनिरिक्षक पी.एस भातुसे करीत आहेत.

“आघाडीकडून अशा प्रकारे पैसे वाटप होणार हे उघडच दिसत होते. कालच्या दोन सभाकडे पनवेलकरांनी फिरवलेली पाठ सर्व काही सांगून गेली. त्यामुळे अशा प्रकारे पैसाचा वापर सुरू केला गेला.  हा प्रकार  युतीचा दक्ष्य कार्यकर्त्यांनी  उघडकीस आणली ते खरोखर कौतुकास पात्र  आहे. रात्र वैऱ्याची आहे जागे रहा असा संदेश आमच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहचला आहे.”

रामदास शेवाळे

महानगरप्रमुख शिवसेना