दोन हजारांचा इतिहास ‘दोनशे’त बदलला

पनवेलमध्ये मतांचा भाव खाली उतरला

नाना करंजुले

पनवेल/प्रतिनिधी- पनवेल विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन दिवसापासून जी रक्कम निवडणुक विभाग व पोलीसांनी पकडली. त्यावरून या ठिकाणी प्रती मताचा भाव कमालीचा ढासळला असल्याची जोरदार चर्चा आहे. मागील एका  निवडणुकीमध्ये  प्रति मताचा दर दोन हजारावर गेला होता. मात्र लोकसभेसाठी हे आकडे दोनशावर आल्याने आर्थकारण बिघडले असल्याची चर्चा आहे.

पनवेल परिसर राजकियदृष्टया अतिशय स्पर्धात्मक समजला जातो. या ठिकाणी कमालीची राजकिय चुरस त्याचबरोबर निवडणीमधील अर्थकारणाची सवय मतदारांना झालेली आहे. पनवेलची निवडणुक म्हटली की कोटयावधी रूपयांचा खर्च असे एक प्रकारे समिकरणच झालेली आहे. त्याला इतर शहर किंवा जिल्हे अपवादाच असतील असे नाही. परंतु पनवेलमध्ये मतदारांचे मोठया प्रमाणात हात ओले होतात असे सांगितले जाते. दोन वर्षापुर्वी पनवेलमध्ये महानगरपालिकेची पहिली निवडणुक पार पडली. एकूण ७८ जागांसाठी निवडणुक झाली त्यामध्ये मोठया प्रमाणात उमेदवारांचा खर्च झाला. ऐन उन्हाळयात राजकिय पक्षांची दमछाक झाली. मात्र मतदार राजाच्या एक प्रकारे चांदी झाली. काही प्रभागात तर दोन नाही तर तीनही  बाजुने जड जड पाकिटे मतदारांना मिळाली. लोकशाहीचा हक्क बजावत असताना लक्ष्मी आयती चालून आल्यामुळे काही मतदारांचा अपवाद वगळता बाकींच्याही चांगलीच कमाई झाली. निवडणुकीत धनलाभ होणार असल्याने कित्येक जणांनी गावावरून आपला मोर्चा पनवेलला  वळवला. काहींना तर मुळ गावातून मतदानाकरीता गाडयांची सोय करण्यात आली होती. हे सर्व करण्यासाठी काही  उमेदवारांना खरोखर कर्ज काढावे लागली त्याची फेड अध्याप झालेली नाही. तर कित्येकांनी आपली आयुष्याची पुंजी या निवडणुकीत लावली. इतका विदारक परिस्थितीचा इतिहास पनवेल महानगरपालिका निवडणुकीत घडला. प्रत्येक वेळी राजकिय पक्ष तसेच उमेदवारांकडे बोट दाखवले जाते. पण जे मतांसाठी पैसे हातात घेतात त्यांचे काय असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होते.  घटनेने दिलेल्या मतदानाच्या हक्काची  बिनधास्त विक्री करणारे या  लोकसभा  निवडणुकीतही आपले हात ओले होतील, या आशेवर होते. ते  ठिकठिकाणी उमेदवाराचे संपर्क कार्यालयाचे उंबरठे झिजवता दिसत होते. काही राजकिय  पदाधिकाऱ्यांना तर आपले फोन बंद ठेवावे लागले.  गेल्या एक दीड महिन्यात प्रचाराचे आर्थकारण पाहता मतदारांना पैसे वाटले जाणार नाहीत अशा प्रकारचे वातावरण दिसत होते. परंतु शनिवारी कामोठे वसाहतीत मतदारांचे हात ओले करण्यासाठी थेट कुरिअर बाँयचा आधार घेण्यात आला, ही बाब उघडकीस आली.रविवारी सुकापुरमध्ये दोनशे रूपयांची 26 पाकिटे भरारी पथकाने पकडली. त्यानंतर देवदला सुध्दा हा प्रकार उघडकीस आला.  यावरून पनवेलमधील मतांचा भाव किती तर पटीने मागील निवडणुकीपेक्षा खाली आल्याचे दिसून आलेच त्याचबरोबर लोकशाहीचीही प्रतारणा झाल्याचे स्पष्ट झाले.