कामगार नेते महेंद्र घरत यांनी केले मतदान

कुटुंबीयांसह बजावले राष्ट्रीय कर्तव्य
पनवेल/ प्रतिनिधी: इंटकचे राष्ट्रीय सचिव  कामगार नेते महेंद्र घरत यांनी सोमवारी प्राथमिक कन्या शाळा गव्हाण येथील मतदान केंद्रावर मतदान केले. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी शुभांगी घरत  व मुलगी सोनाली यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी गव्हाण परिसरातील मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती.
महेंद्र घरत हे काँग्रेसचे नेते असून 2014 साली त्यांनी विधानसभा निवडणुक लढवली होती. रायगड जिल्हा काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी कौटुंबिक संबंध घरत यांनी जपले आहेत. गेल्या दीड दशकापासून ते काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांचा प्रभावीपणे प्रचार महेंद्र घरत यांनी केला . उरण विधानसभा मतदारसंघ हे त्यांचे होम ग्राउंड असल्याने या भागात पार्थ यांना मताधिक्य देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी विशेष प्रयत्न केले. भव्य दिव्य असा महिला काँग्रेसचा मेळावा आयोजित करून 
वातावरण निर्मिती केली. उरण काँग्रेसची संपूर्ण ताकत त्यांनी आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभी केली. शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या गैरहजेरीत उरणमधील प्रचाराची धुरा महेंद्र घरत यांनी सांभाळली. पदयात्रा, प्रचारसभा आणि गाठी भेटीच्या निमित्ताने थेट मतदारांशी संवाद साधला. आज त्यांनी आपल्या मूळ गावी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे सर्वांनी मतदान करून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन महेंद्र घरत यांनी मतदारांना केले.