हळदीच्या  अंगाने बजावले राष्ट्रीय कर्तव्य

अधि केले मतदान …मग शुभमंगल सावधान

खांदा वसाहतीत नवरदेवाचे लग्ना अधि  मतदान

नाना करंजुले 

पनवेल/प्रतिनिधी-पनवेल विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदानाकरीता बऱ्यापैकी उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे खांदा वसाहतीत नवरदेवाने आगोदर मतदान केले आणि नंतर  वऱ्हाड लग्नासाठी रवाना झाले. हळदीच्या अंगाने राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी आलेल्या या वराकडे सर्वजण कुतुहलाने पाहत होते.

लोकसभेच्या चौथ्या टप्प्याने मतदान सोमवारी झाले. त्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या  पनवेल विधानसभा मतदारसंघात सकाळपासून मतदानाला  उत्साह दिसून येत होता. मतदान केंद्रावर तरूणांची संख्या अधिक दिसली . ११ वाजण्याच्या सुमारास खांदा वसाहतीतील  महात्मा स्कुल  येथील मतदान केंद्रावर  अजिंक्य डावलेकर मतदान करण्यासाठी आले. अंगात हळद लावलेला झब्बा कुडता, डोक्यात टोपी, कपाळाला मुंडावळ्या बांधलेला या  मतदाराने सर्वाचे लक्ष्य आकर्षित करून घेतले. सेक्टर -१ येथील सुयोग अपार्टमेंट येथे राहणाऱ्या अजिंक्य यांनी लगीन घाई काही वेळ बाजूला ठेवली. पै पाहुण्याचे स्वागत अर्धा तास  थांबवत थेट मतदान केंद्र गाठले आणि आपला मतदानाचा हक्का बजावलाच. यामाध्यमातून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. अधिक मतदान आणि मग लग्न अशी खुनगाठ मी  मनाशी बांधली होती. त्याच भावनेतून घटनेने दिलेला अधिकाराचा वापर केला असल्याचे डावलेकर यांनी सांगितले . सोमवारी सायंकाळी श्वेता या मुलीशी अजिक्य विवाहबध्द होणार आहेत. त्यांना मतदान केंद्रावर सदानंद शिर्के, अर्चना क्षिरसागर त्याचबरोबर इतर मतदार आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.