मावळमध्ये शिवसेना हॅट्रिकच्या  दिशेने

श्रीरंग बारणे मोठ्या विजयाच्या जवळ
पनवेल प्रतिनिधी
अतिशय प्रतिष्ठेच्या समजणाऱ्या मावळ लोकसभा मतदार संघात एकूण कलाचा विचार घेता. ही लढत एकतर्फी झाल्याचे  काही फेरींमध्ये तरी दिसून आले . हा  सर्व निकालाचा कल पाहता या मतदारसंघात शिवसेना सलग तिसऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे . त्याचबरोबर खासदार श्रीरंग बारणे आपल्या दुसर्‍या मोठ्या विजयाच्या जवळ पोहोचले आहेत.
2009 ला पुनर्रचनेत मावळ लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाली. पुणे आणि रायगड जिल्ह्याचा समावेश असलेल्या या मतदारसंघात प्रत्येकी तीन-तीन असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पहिली निवडणूक शिवसेनेने शेतकरी कामगार पक्षाला बरोबर घेऊन लढवली. त्यावेळी  राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांचा गजानन बाबर यांनी पराभव केला.2014 च्या निवडणुकीत त्याठिकाणी श्रीरंग बारणे यांना संधी देण्यात आली. मोदी लाट आणि शिवसेनेला मानणारा वर्ग यामुळे बारणे दीड लाखाच्या फरकाने जिंकून आले. तेही लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात, एकंदरीतच मावळ आणि शिवसेना असे एक प्रकारचे समीकरण गेल्या दशकभरात झाले होते. या निवडणुकीत मतदारसंघ काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट पार्थ अजित पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवले. या कारणाने 
मावळची लढाई प्रतिष्ठेची झाली होती. आपल्या विजयाबाबत श्रीरंग बारणे निश्चिंत होते. माझ्याकडून पहिल्यांदा पवार कुटुंबीयांचा पराभव होणार असे भाकीत त्यांनी बुधवारी वर्तवले होते. आणि त्यानुसार आज सकाळपासूनच प्रत्येक फेरीमध्ये श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली तिही मोठ्या फरकाने. त्यामुळे फेरी निहाय राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांच्या आशा मावळायला सुरुवात झाली. तेराव्या फेरी मध्ये श्रीरंग बारणे यांनी एक लाख 19 हजार मतांची आघाडी घेतली. ती आघाडी तशीच पुढे सुरू राहिली. इतके मोठे मताधिक्य असल्याने त्यापर्यंत पोहोचणे पार्थ पवार यांच्यासाठी कठीण होऊन बसले. या सर्व गोष्टींचा विचार करता शिवसेना मावळमध्ये हॅट्रिक च्या दिशेने वाटचाल करताना  दिसत आहे. तर श्रीरंग बारणे पुन्हा विजयाच्या  जवळ पोहोचले आहेत.