राधाकृष्ण विखे पाटील यांना  गृहनिर्माण खाते

अशिष शेलार राज्याचे नवे शिक्षणमंत्री 
मुंबई /प्रतिनिधी: शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारा नंतर कोणाला कोणते खाते मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार खाते वाटप करण्यात आले असून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे प्रकाश मेहता यांचे गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. तर अशिष शेलार राज्याचे नवे शालेय शिक्षण मंत्री असणार आहेत. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे रोजगार हमी आणि संजय कुटे यांना कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती या विभागाचे मंत्रीपद देण्यात आले आहे.
बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप जाहीर झाले आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर विखे पाटील यांना गृह निर्माण 
मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. तर विनोद तावडे यांच्याकडील शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण विभाग शेलार यांच्याकडे देण्यात आला आहे. अनिल बोंडे राज्याचे नवे कृषिमंत्री असतील. सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी सुरेश खाडे यांच्यावर देण्यात आली आहे. अशोक उईके राज्याचे नवीन आदिवासी विकास मंत्री असतील. तानाजी सावंत यांच्याकडे जलसंधारण विभाग देण्यात आला आहे. तर प्रा. राम शिंदे पणन व वस्त्रोद्योग विभागाची जबाबदारी सांभाळतील. संभाजी पाटील निलंगेकर यांना गिरीश बापट यांच्या कडील अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण हा विभाग देण्यात आला आहे. तर जयकुमार रावल यांना अन्न व औषध प्रशासन या खात्याची धुरा देण्यात आली आहे. त्याच्याबरोबर  रावल राज्याचे नवीन राजशिष्टाचार मंत्री असतील. सुभाष देशमुख यांच्याकडे मदत व पुनर्वसनाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. योगेश सागर हे नगर विकास राज्यमंत्री म्हणून काम पाहतील. आरपीआयचे अविनाश महातेकर हे सामाजिक न्याय राज्यमंत्री असतील. संजय भेगळे यांना कामगार, पर्यावरण, मदत पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन या विभागांचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम, वने, आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री म्हणून डॉक्टर परिणय फुके काम करतील. तर अतुल सावे यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विभाग विकास विभागाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपवली आहे.