मुरुड येथे समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

मृतांपैकी एक पनवेल येथील पर्यटक
मुरुड /प्रतिनिधी. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोन पर्यटकांचा मुरुड येथे मृत्यू झाला. काशीद बीच वर ही घटना घडली असून मृतांपैकी एक पर्यटक येथील असल्याचे समजते. या घटनेची मुरुड पोलीस ठाणे नोंद करण्यात आली आहे.

रविवारी 11 वाजण्याच्या सुमारास अभिषेक म्हात्रे वय 32 वर्षे रा. नावडे ता. पनवेल हे त्यांचे दोन नातेवाईक पुजा शेट्टी व रोहिणी कटारे राहणार कोपरखैरणे यांच्या सह मुरुड येथील फार्म हाऊस येथे आले होते. सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान अभिषेक व पूजा हे काशिद बीच वर पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते दोघेही समुद्रात बुडाले. त्या नंतर तेथे उपस्थित असलेल्या रोहिणी यांनी आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने अभिषेक व पूजा यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना त्वरित बोरली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले . मुरुड पोलीस पुढील तपास करीत आहेत.