खांदा वसाहतीतील दोनशे झोपडयांमध्ये पाणी

सिडकोने वाऱ्यावर सोडल्याने निर्माण झाली परिस्थिती
पनवेल/प्रतिनिधी- खांदा वसाहतीत दिवा-पनवेल रेल्वेमार्गाच्या कडेला असलेल्या जवळपास दोनशे झोपडया पावसामुळे पाण्यात गेल्या आहेत . वीसपेक्षा जास्त वर्षापासून राहात असलेल्या या झोपडपट्टीधारकांचे पुर्नवसन सिडकोने केले नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी स्थानिक नगरसेविका सीताताई  पाटील यांनी या ठिकाणी जावून पाहणी केली. याबाबत सिडकोकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
खांदा वसाहतीत सेक्टर 11 येथील मोकळया भूखंडावर झोपडया करून काही कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून राहत होते. त्यामध्ये आनखी काही झोपडयांची भर पडली. त्यामुळे हा संपुर्ण भूखंड पुर्णपणे व्यापला गेला. सिडकोने त्या ठिकाणच्या झोपडया हटवल्या. सदया येथे इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे येथील झोपडपट्टीधारकांनी रेल्वेच्या जागेत अश्रय घेतला. दरम्यान यापैकी काही जणांचा पनवेल नगरपालिकेने झोपडपट्टी पुनर्वसनार्तंगत सर्व्हे केला होता. त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्राची पडताळणी झाली होती. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाकरीता ठोस पावले उचलले आहेत. पनवेल शहरासाठी सादर केलेल्या आराखडयाला उच्चस्तरीय समितीकडून हिरवा कंदील मिळाला आहे. दरम्यान सिडको भूखंडावर झोपडयांच्या पुनर्वसनाबाबत महापालिकेने विचारना केली होती. मात्र त्यांना पंतप्रधान आवास योजनेर्तंगत घरे दिले जाणार असल्याचे सांगत याकरीता आनखी भूखंड महापालिकेला देता येणार नाही असे लेखी कळविण्यात आले होते. सिडकोच्या या धोरणाचा फटका इतर नोडमधील झोपडयांबरोबर खांदा वसाहतीही बसला. शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाचे पाणी जवळपास दोनशे झोपडयांमध्ये गेले. दोन ते अडिच फुट पाणी साचल्याने त्यांना तिथे राहता येत नाही. लहान मुले आजारी पडले आहेत. आमच्या डोळयाला डोळा लागला नाही. तसेच जेवन सुध्दा केले नसल्याचे झोपडपट्टीधारकांनी सांगितले. दरम्यान प्रभाग-15मधील नगरसेविका सीताताई  पाटील यांनी मंगळवारी या ठिकाणी जावून पाहणी केली.झोपडपट्टीधारकांनी त्यांच्या व्यथा पाटील यांच्याकडे मांडली.

“महानगरपालिकेने पनवेल शहरातील झोपडपट्टया घोषीत केल्या आहेत. त्याचबरोबर पुनर्वसनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु सिडकोच्या जागेवरील झोपडयांबाबत प्राधिकरणाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याबद्दल आपण सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता.गेल्या अनेक वर्षापासून राहत असलेल्या या गरीबांचे पुर्नवसन व्हावे याकरीता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा सुरू आहे.
सीताताई  पाटील
नगरसेविका, पनवेल महानगरपालिका