खाजगी बसेसकडून तक्का रोड हायजॅक

रहदारीला मोठया प्रमाणात अडथळा
सभापती तेजेस कांडपिळे यांची कारवाईची मागणी
पनवेल/प्रतिनिधी- पनवेल रेल्वेस्थानक ते तक्का या रोडवर मोठया प्रमाणात खाजगी बसेस उभ्या राहत आहेत. यामुळे वाहतुक व रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. संबधितावर कारवाई करण्याची मागणी प्रभाग समिती ड चे सभापती तेजस कांडपिळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल शहर वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी अभिजित मोहिते यांना निवदेन दिले आहे.
पनवेल रेल्वेस्थानकहून अरूणोदय चौक ते पिर जमाल शहा दर्गा हा रस्ता तक्का गावाकडे जातो. या ठिकाणी इतर वाहनांची सतत ये जा सुरू असते. त्याचबरोबर सकाळच्या प्रहरी स्थानिक रहिवाशी माँर्निंग वाॅकला जातात. एकंदरीत तक्का येथील रहिवाशांकरीता हा मार्ग अतिशय महत्वाचा आहे. असे असताना या ठिकाणी खाजगी कंपन्याच्या बसेस उभ्या केल्या जातात. विशेष करून रात्रीच्या वेळी या रोडला चक्क पार्किंगचे स्वरूप प्राप्त होते.या व्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशीत तर दुतर्फा बसेस उभ्या असतात. त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे. येथे जागाच राहत नसल्याने वाहतुक कोंडी होते. तसेच बसेस धुताना पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडत असल्याच्याही तक्रारी येत आहेत. वर्दळीच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या या बेकायदेशीर पार्किगबाबत स्थानिक नगरसेवक म्हणून प्रभाग समिती ड चे सभापती तेजस कांडपिळे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी याबाबत पनवेल शहर वाहतुक शाखेकडे तक्रार केली आहे. संबधितांवर कारवाई करून अरूणोदय चौक ते पिर जमाल शहा दर्गा हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी कांडपिळे यांनी केली आहे.