महावितरणचे नवीन विजेचे खांब कोसळले

निकृष्ट दर्जाच्या कामाचा परिपाक
तळोजे मजकूर, करवले, तुर्भे, पिसार्वेची बत्ती गुल
पनवेल/प्रतिनिधी- वारंवार पाठपुरावा केल्यामुळे तळोजा मजकुर परिसरात गावांना वीजपुरवठा करणारे विजेचे खांब तसेच वाहिन्या नुकत्याच बदलण्यात आल्या आहेत. परंतु त्यापैकी काही खांब पावसात पडल्याने तळोजे मजकूरसह , करवले, तुर्भे, पिसार्वेची बत्ती गुल झाली आहे. त्यामुळे निष्कृष्ट दर्जाचे काम चव्हाटयावर आले आहे. या संदर्भात स्थानिक नगरसेवकांनी महावितरण कंपन्याच्या अधिकाऱ्यांना पत्र देवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
तळोजा परिसरातील विदयुत वितरण यंत्रणा जुनाट आणि जिर्ण झाल्याने विजेचा लंपडाव काही वर्षापासून सुरू होता. विजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने आजूबाजुच्या गावातील ग्रामस्त त्रस्त होते. या गावांमधील बत्ती कधी ही गुल होत असल्याने या ठिकाणची जुनी झालेली यंत्रणा बदलण्यात यावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने मोठया संख्येने पत्रप्रपंचा करावा लागला. शेवटी या ठिकाणचे खांब आणि वाहिन्या उभारले. परंतु गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसात हे खांब शेतजमीनीत उन्मळून पडले. त्यामुळे या गावांमधील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तसेच शेतकऱ्यांना सुध्दा शेतीचे कामे करता येत नाहीत. या अनुषंगाने नगरसेवक हरेश केणी, रविकांत म्हात्रे,ज्ञानेश्वर पाटील पाटील यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. संबधीत ठेकेदाराला काळया यादयात टाकावेत तसेच वीजवितरण व्यवस्था त्वरीत दुरस्त करून कार्यन्वित करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी वासुदेव पाटील, मुकुंद म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, संजय म्हात्रे, लक्ष्मण पाटील, हेमंत पाटील उपस्थित होते