तीन हजार कपात सूचना आणल्या  तीनशेवर

विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी यांची  कामगिरी
सनदी अधिकाऱ्यांना वठणीवर आणले
नाना करंजुले
मुंबई/ प्रतिनिधी: – परखड स्वभाव, कडक  शिस्तीचे आमदार म्हणून सुपरिचित असलेले विधानसभेच्या उपाध्यक्षांनी या पदावर  कमी कालावधीत आपल्या कामाचा ठसा उमटवला. या अगोदर तीन  हजार कपात  सूचनांवर विधानसभेच्या आमदारांना उत्तर देण्यात आली   नव्हती. परंतु विजयराव औटी यांनी पदभार घेतल्यानंतर ही संख्या तीनशेवर   आली. इतकेच नाही तर त्यांनी सनदी अधिकाऱ्यांना ही वठणीवर आणण्याचे काम केले. हा सर्व अनुभव मंगळवारी समारोपाच्या दिवशी त्यानी कथन केल्यानंतर सभागृह अवाक झाले.दरम्यान  मुख्यमंत्र्यांसह सर्व सदस्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.
सहा महिन्यांपूर्वी विधानसभा उपाध्यक्षपदी पारनेर नगर चे आमदार विजयराव औटी यांना संधी देण्यात आली. प्रशासनावर अंकुश, काम करण्याची हातोटी, प्रत्येक प्रश्न सुटला पाहिजे ही भावना असे अनेक वैशिष्ट्ये त्यांच्याबाबत सांगता येतील. स्पष्टवक्तेपणा, नियमितपणा यासारख्या अनेक गोष्टींमुळे विजयराव औटी परिचित आहेत. अभ्यासू, दांडगा जनसंपर्क, अनुभव, उत्तम वक्ते या जमेचा बाजु पाहुन  उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. वास्तविक पाहता त्यांना कमी कार्यकाळ मिळाला. परंतु त्यातही औटी यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आढावा घेत असताना विधानसभेच्या आमदारांच्या तीनशे कपात सुचना उत्तरच गेले  नसल्याची माहिती पुढे आली. वास्तविक पाहता नियमानुसार 30 दिवसांच्या आत मध्ये संबंधित  कपात सूचनेला उत्तर देणे बंधनकारक आहे. असा नियम असताना त्याबाबत कार्यवाही होत नव्हती. पेपर  लीग समिती प्रमुख या नात्याने त्यांनी सनदी अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या, आणि या कपात सुचना प्रलंबित न ठेवण्याचे आदेश दिले हे प्रमाण आता फक्त तीनशे वर आले आहे. फक्त तीस आमदारांच्या कपात सूचनांवर उत्तर देणे बाकी राहिले आहे. त्यांनाही 30 दिवसांच्या आत ते मिळेल. अनेक सनदी अधिकारी विविध समित्यांच्या साक्षीला हजर राहत नव्हते, याबाबत  विधानसभेच्या उपाध्यक्षांनी कारवाईचे संकेत दिल्यानंतर ते उपस्थित राहू लागले. मंगळवारी पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील , हे शेवटचे अधिवेशन असल्याने मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष विजय औटी यांनी आपले अनुभव कथन केले. त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे  या पदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल  आभार मानले. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही  कोणताही हस्तक्षेप न करता विश्वास टाकला असल्याचेही ते म्हणाले. याव्यतिरिक्त सभागृहातील सर्व सदस्यांना धन्यवाद देत असताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सनदी अधिकाऱ्यांनी सभागृहाला गृहीत धरू नये
राज्यातील सनदी अधिकारी हे विधिमंडळाला गृहीत धरता, पण सभागृह हे सर्वोच्च स्थानी आहे. या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतात . हे कायदेमंडळ आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी सभागृहाचा आदर केलाच पाहिजे अशी भावना विधानसभेचे उपाध्यक्ष  विजयराव औटी यांनी बोलून दाखवली.