बॉम्ब… खंडणी … दहशतीचे मनसुबे उधळले

कळंबोली बॉम्ब प्रकरणी तीन आरोपी गजाआड

नवी मुंबई पोलीसांच्या विशेष तपास पथकाची कामगिरी

पनवेल/प्रतिनिधीः-  कळंबोली सुधागड हायस्कुलसमोर  ठेवण्यात आलेल्या बॉम्ब प्रकरणाचा नवी मुंबईच्या  विशेष तपास पथकाने आखेर छडा लावला. त्याचबरोबर या प्रकरणातील तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. संबधीतांनी नवी मुंबई परिसरातील बांधकाम व्यवसायिकांकडून खंडणी उकळण्यासाठी बॉम्बचा प्रयोग केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे त्यांना धमाकावून दहशत माजवायची असा त्यांचा विचार होता. परंतु नवी मुंबई पोलीसांनी त्यांचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले.  

सुशील साठे (35), राहणार कोंढवा पुणे ,   मनीष भगत (45),दीपक दांडेकर (55)  दोघेही राहणार  उलवे अशी अटक आरोपींची नावं आहेत. दरम्यान  कळंबोली सारख्या सर्वसामान्यांच्या वसाहतीत अशा प्रकारे  बॉम्ब ठेवल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सुधागड शाळेसमोर बॉम्बसदृश्य वस्तु आढळल्याने घातपाताची शक्यता निर्माण झाली होती. पनवेल हे दशहतवादाच्या तोंडावर आल्याचे भय निर्माण झाले होते. या प्रकरणाला  अनेक फाटे फुटले होते, तसेच तर्क वितर्क लढवले जात होते. पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी या  तपास कामी विशेष पथक नेमले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम, प्रदिप कन्नुल, रविंद्र गिडे यांच्यासह गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक-3चे  वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने, संदिपान शिंदे, कोंडिराम पोपेरे, अजयकुमार लांडगे, निवृत्ती कोल्हटकर, शिरिष पवार, राहुल राख, रूपेश नाईक, राजेश गज्जल, सुधिर निकम, विजय चव्हाण, संदीप गायकवाड , भुषण कापडणीस, योगेश वाघमारे, राणी काळे, योगेश देशमुख,नितीन शिंदे व इतर कर्मचाऱ्यांच्या त्यामध्ये समावेश होता. आरोपींना मोठया शिताफिने पुणे आणि नवी मुंबई परिसरातून अटक करण्यात आली. त्यांनी या गुन्हयाची कबुल दिली.  बांधकाम व्यवसायिकांमध्ये दहशत माजविण्याकरीता बॉम्बचा आधार घेण्याचा शक्कल या तिघांनी लढवली. संबधीत बांधकाम व्यवसायिकाला फोन करून आम्हाला पैसे दे नाही तर तुझी साईटबॉम्बने उडवू अशी धमकीचा फंडा त्यांनी अवलंबण्याचा निर्णय घेतला होता . त्याचबरोबर संबधीत बांधकाम व्यवसायिकांनी कोणाला  माहिती देवू नये याबाबत धमकाविण्याचे तंत्र त्यांनी आवगत केले होते. त्याच  अनुषंगाने कळंबोली येथील नवीन इमारतीच्या ठिकाणी हातगाडीवर बॉम्ब ठेवण्यात आला होता. जेणेकरून बिल्डरांच्या मनात भय निर्माण होवून त्यांच्याकडून सहजरित्या खंडणी उकळता येईल. हेच कळंबोलीत बॉम्बप्रकरणामागील हेतु असल्याचे उघड झाले आहे. एक झाले की दुसऱ्या ठिकाणी करायचे असे आरोपींच्या डोक्यात होते.

वळवलीत बनवला बॉम्ब

दीपक दांडेकर  याची दगडखाण असल्याने त्याला आतमध्ये सुरुंग घेणे तसेच त्याकरीता लागणारे स्पोटके याबाबतची इत्यंभूत माहिती होती. त्यानुसार या तिघांनी  वळवली येथील एका रूममध्ये बॉम्बतयार केला. त्याला टायमर लावून तो सुधागड हायस्कुलसमोरील बांधकामाजवळ ठेवला.  

हातगाडी ढकलणार होता  सुशील साठे

या घटनेनंतर पोलीसांनी या परिसरातील सीसी टिव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये हातगाडी ढकलतानाचे दृश्य कैद झाले होते. त्याचबरोबर  त्याच्या  फुटेजचा  व्हिडिओ सोशल मिडियातही व्हायरल झाला होता. तो हातगाडी ढकलणारा आरोपी सुशील साठे होता. त्यानेच बॉम्ब व हातगाडी संबधीत ठिकाणी ठेवून पोबारा केला.

का केले आरोपीने असे

साठे आणि दांडेकर हे कमालीचे कर्जबाजारी झाले होते. त्यांना पैशाची  गरज होती तीही मोठया रक्कमेची. त्यामुळे अशा प्रकारेबॉम्बच्या आधारे दहशत माजवून बांधकाम व्यवसायिकांकडून पैसे घ्यायचे आणि कर्ज फेडायचे. त्याचबरोबर श्रीमंत व्हायचे हा उद्देश त्यांचा होता. त्याकरीता त्यांनी मनीष भगत याला मदतीला घेतले.