नवी मुंबई पोलिसांच्या तपास कौशल्याचे प्रकटीकरण

सतरा दिवसांच्या अखंडित परिश्रमाला  यश
क्लिष्टतेत बारकाव्यांच्या शोधाने केली   कळंबोली बॉम्ब प्रकरणाची उकल 
नाना करंजुले 
पनवेल /प्रतिनिधी- कळंबोली सुधागड हायस्कुलसमोर  ठेवण्यात आलेल्या बॉम्ब प्रकरणाचा नवी मुंबईच्या  विशेष तपास पथकाने सलग सतरा दिवस अथक परिश्रम घेऊन छडा लावला. या गुन्ह्यात क्लिष्टतेत बारकावे शोधत पोलिसांनी अतिशय शिताफीने या गुन्ह्याची उकल केली. त्याचबरोबर आरोपींना जेरबंद करीत या पथकाने आपल्या कौशल्याचे खऱ्या अर्थाने प्रकटीकरण केले. त्याचबरोबर पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी  दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. याशिवाय जनतेचा विश्वास संपादन करीत गुन्हेगारांना एका अर्थाने जरब बसवला.
कळंबोली सारख्या माथाडी कामगारांचे वास्तव असणाऱ्या वसाहतीत बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. एकंदरीतच मुंबईपासून जवळ असलेला हा परिसर दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचाही कयास लावला जात होता. ही वस्तु निकामीव करण्यासाठी जवळपास दहा तासांचा अवधी लागला. एकंदरीतच हा सर्व प्रकार येथील रहिवाशांना काहीसा वेगळा आणि मनात भय निर्माण करणारा होता. अशाप्रकारे जिवंत बॉम्ब सापडण्याची नवी मुंबईतील ही पहिलीच घटना होती. त्यामुळे हा परिसर एक प्रकारे दहशतीच्या सावटाखाली गेल्या 17 ते 18 दिवस वावरत होता. या प्रकरणाचा छडा लावून यापाठीमागे नेमके कोण आहे. या गोष्टीचे लवकरात लवकर प्रगटीकरण करणे गरजेचे झाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही बाब महत्त्वाची झाली होती. मात्र पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी आपल्या अधिकार्‍यांवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी या कामी विशेष पोलिस पथकाची स्थापना केली. त्या पथकामध्ये गुन्हे अन्वेषण आणि प्रकटीकरणात हातखंडा असलेले विजय कादबाने, संदिपान शिंदे या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या दोन्ही अधिकाऱ्यांनी सहाय्यक निरीक्षक म्हणून  नवी मुंबईत काम केलेले  आहे. त्यांच्या नावावर अनेक गुन्ह्यांची उकल नोंदली गेली आहे. त्याचबरोबर या परिसराची त्यांना खडानखडा माहिती आहे. या सर्व गोष्टींचा फायदा तपासकामी उपयोगी पडला. याव्यतिरिक्त कोंडीराम पोपेरे, अजय कुमार लांडगे यांच्यासारखे अनुभवी अधिकारी या तपास पथकात होते. त्यांचा अनुभव या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपयोगी ठरला.
निवृत्ती कोल्हटकर, शिरिष पवार, राहुल राख, रूपेश नाईक, राजेश गज्जल, सुधिर निकम, विजय चव्हाण, संदीप गायकवाड , भुषण कापडणीस, योगेश वाघमारे, राणी काळे, योगेश देशमुख,नितीन शिंदे हे अधिकारी सोबतीला होतेच. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपींनी हा गुन्हा करत असताना खूप कमी चुका करण्याचा प्रयत्न केला. बॉम्ब ठेवत असताना त्यांनी आपले तोंड झाकून ठेवले होते. त्याचबरोबर ज्या दुचाकीचा वापर केला त्याचा नंबर ही बनावट होता. पोलिसांनी लाखो सीसीटीव्ही फुटेज तपासले. सतरा दिवस  दोन  ते  तीन तासही   झोप घेतली नाही. या गुन्ह्यात वापरलेली  प्रत्येक वस्तू कुठून आणली याचा शोध पोलिसांनी घेतला. संशयित आरोपींची हजारो जणांना फोटो दाखवून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पातळीवर ठाण मांडत वेगवेगळ्या शक्यतांची पडताळणी केली. याबाबत गुप्त माहिती सुद्धा घेण्यात आले. शेवटी पोलिसांनी सुशील साठे, मनीष भगत,दीपक दांडेकर या आरोपींना अटक केली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यां नी केली मदत
दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये झालेल्या चित्रीकरणाचा तपासामध्ये फायदा झाला. हातगाडीवर बॉम्ब ठेवणाऱ्याने तोंड बांधल्याने सुरुवातीला माहिती मिळू शकले नाही. दोन संशयित मोटरसायकलवर  जात असल्याचे फुटेज मिळाले परंतु त्या गाडीचा नंबर हा बनावट होता. त्यानंतर हेच दोघेजण एका कारमध्ये जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. आणि याच ठिकाणी तपासाची चक्रे फिरली. ही गाडी दीपक दांडेकर याची असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर सीबीडी येथील भंगार वाल्याच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दांडेकर आणि भगत अलगद अडकले.