रवींद्र चव्हाणांकडे पालघरच्या पालक मंत्री पदाचा अतिरिक्त पदभार

मुख्यमंत्र्यांकडून आणखी एक महत्त्वाची जबाबदारी
पनवेल /प्रतिनिधी:- राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे रायगड बरोबरच आता पालघर ची सुद्धा पालक मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवत. रायगडात केलेल्या चांगल्या कामाची एक प्रकारे पावती दिली आहे . त्यांच्या समर्थकांमध्ये त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गुड बुका मधील मंत्र्यांपैकी रवींद्र चव्हाण एक आहेत. कल्याण डोंबिवली परिसरात भारतीय जनता पक्षाची ताकत वाढवणाऱ्या चव्हाण यांना फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात बळ दिले. गेल्यावर्षी प्रकाश मेहता यांच्याकडून रायगड चे पालकत्व काढून घेत त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांची वर्णी लावण्यात आली. गेल्या वर्षभरात पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यात चांगले काम केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना सोबत घेऊन रायगडात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवली. पालकमंञ्यांनी  माजी मंत्री रवीशेठ पाटील व कर्जत खालापूर चे माजी आमदार देवेंद्र साटम यांना पक्षात आणले. त्यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये भाजपाची ताकद वाढली. त्याचबरोबर इतर ठिकाणीही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देत प्रभाव वाढवला. कर्जत नगरपालिका निवडणुकीत राज्यात आणि केंद्रात संबंध बिघडलेले  असतानाही शिवसेनेला सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेतून पायउतार केले. याशिवाय मावळ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. एकंदरीतच दिलेली जबाबदारी सक्षमपणे तसेच यशस्वीरित्या  सांभाळल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी विश्वास संपादन केला आहे. त्याचाच परिपाक म्हणून विष्णू सावरा यांना मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे रिक्त झालेल्या पालघर पालक मंत्री पदाची अतिरिक्त जबाबदारी चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वपूर्ण समजली जाते. त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांचे शासन दरबारी तसेच पक्षात वजन वाढल्याचे ही यावरून स्पष्ट होत आहे.
“पालघर आणि रायगड या कोकणातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवलेली आहे. ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन
. मुख्यमंत्री  देवेन्द्रजी फडणवीस यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो पूर्णपणे सार्थ ठरवेन.”
रविंद्र चव्हाण
पालकमंत्री रायगड, पालघर