जामखेड कर्जत शहरांसाठी आणखी सहा कोटींचा निधी

केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार मिळणार अनुदान
लवकरच नगरपरिषद आणि नगरपंचायतकडे  वर्ग होणार
ऑनलाईन बातमी न्यूज नेटवर्क
अहमदनगर/ प्रतिनिधी: – जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा .राम शिंदे यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊन विकास कामे केली जात आहेत. त्याचबरोबर जामखेड आणि कर्जत शहरांकरिता 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन 2019 – 20 या आर्थिक वर्षातील अनुदानाचा सुमारे सहा कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. लवकरच हा निधी नगरपरिषद आणि नगर पंचायतीकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यातून दोन्ही ठिकाणी विकास काम करता येणार आहेत.
जामखेड कर्जत विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने पालकमंत्र्यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे. गेल्या साडे चार वर्षांमध्ये येथील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निधी खर्च करीत असताना. जामखेड आणि कर्जत या शहरांमध्येही प्रा. शिंदे आणि विशेष लक्ष दिलेला आहे. रस्ते ,गटारे, पथदिवे, याशिवाय इतर मूलभूत सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून निधी खर्च करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार हालचाली सुरू आहेत. कर्जत आणि जामखेड या शहरांचा कायापालट करण्याचा संकल्प पालकमंत्र्यांनी केलेला आहे. त्यानुषंगाने विविध विकास कामे वर्षभर सुरूच आहेत. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्याचबरोबर 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील नागरिक   स्वराज्य संस्थांना अनुदान दिले जाते. याबाबत 10 जुलै रोजी राज्य शासनाने अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. क्षेत्रफळाच्या निकषानुसार ड वर्ग महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीला हे अनुदान देण्यात येणार आहे. त्यानुसार जामखेड नगर परिषद आणि कर्जत नगरपंचायतीला लवकरच निधी प्राप्त होणार आहे. त्या पैशातून शहरातील आणखी विकास कामे करता येणे शक्य होणार आहे.

कर्जत नगरपंचायत – 2, 13, 71, 322
जामखेड नगर परिषद 3, 77, 07, 460