महापालिकेला हवेत स्वतःच्या मालकीचे टँकर

विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा प्रस्ताव
पैसे, वेळ, अपव्यय पाणी चोरी टाळता येणार 
पनवेल/ प्रतिनिधी:-  पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीत मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने सातत्याने टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे या
ठिकाणी खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागतो. यामधून वेळ, पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. याला पर्याय म्हणून महापालिकेने आपल्या धोरणात बदल करून आपल्या  मालकीचे टँकर खरेदी करावेत आणि त्या माध्यमातून टंचाईसदृश्य ठिकाणे पाणी देण्यात यावे असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी दिला आहे.
पनवेल महानगरपालिकेकडे देहरंग धरण वगळता स्वतःच्या मालकीचा असा दुसरा पाण्याचा स्त्रोत नाही. या धरणाची ही जलधारण क्षमता ही कमी असल्याने त्यातून पनवेल परिसराची तहान भागवणं शक्य नाही. त्यामुळे पाण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर अवलंबून राहावे लागते. पनवेल शहराबरोबरच कळंबोली आणि नवीन पनवेल या सिडको वसाहतींची हीच अवस्था आहे. एकंदरीतच पनवेल करांची तहान ही दुसऱ्यांवर अवलंबून आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला लागलेल्या फुटीच्या ग्रहामुळे 40 टक्के पाणी गळती होते. परिणामी पनवेलला मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही.
उन्हाचे चटके बसू लागताच  पनवेल महानगरपालिका हद्दीत पाणी टंचाई सुरु होते. नागरिकांचे पाण्यासाठी हाल होतात. त्यांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय उरत नाही.   मनपा प्रशासनाकडून वर्षभर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. यासाठी ठेकेदाराला लाखो रुपये अदा केले जातात. मात्र त्याच्याकडून  गैरव्यवहार होत असल्याचे नुकतेच उजेडात आहे. ठेकेदार व प्रशासनातील काही अधिकारी यांचे साटेलोटे असल्यानेच पाण्याचा काळाबाजार सुरु असल्याचे आरोप होत आहेत. नगर परिषद असताना परिषदेच्या  मालकीचे टँकर  होते. मात्र महापालिका स्थापन झाल्यानंतर स्वतःच्या मालकीचे टँकर उपलब्ध नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी  महानगर पालिकेने आपल्या धोरणात बदल करून स्वतःच्या मालकीचे टँकर खरेदी करून पाणी पुरवठा करावा  असा प्रस्ताव ठेवला आहे.
पाण्याचा गैरवापर टळेल
एखाद्या  सोसायटीची पाण्याच्या टाकी  6 ते7 हजार लिटरची क्षमता असते. तर टँकर १० हजार लीटरचा असतो. त्यामुळे उरलेल्या ३ हजार लीटर पाणी कुठे जाते. काही वेळेला टँकर चालकांचा मनमानी कारभार पाहावयास मिळतो.  त्यामुळे पालिकेने स्वतःच्या मालकीचे टँकर खरेदी करून पाणी पुरवठा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, डॉ. सुरेखा मोहोकर, सारिका भगत, प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी पालिकेकडे केली आहे.