महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व अहमदनगरकडे

बाळासाहेब थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी
 प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करण्याचे तगडे  आव्हान
नाना करंजुले
मुंबई/ प्रतिनिधी राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेतृत्व अहमदनगर कडे आले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही जबाबदारी थोरात यांच्याकडे आल्याने अनुकूल वातावरण तयार करण्याचं मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा घेऊन राजकारण आणि समाजकारण बाळासाहेब यांनी आपला ठसा उमटवला आहे. अतिशय संयमी, अभ्यासू, निष्कलंक त्याचबरोबर राजकारणातील अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे ते नेतृत्व करीत आहेत. राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते खंदे समर्थक होते. त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्याचबरोबर महाराष्ट्रात सहकार रुजवण्यामध्ये  त्यांचा वाटा मोलाचा होता. थोरात कुटुंबीय काँग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले आहेत. आघाडी शासनाच्या काळामध्ये बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे महसूल, कृषी आणि शिक्षण खाते सांभाळले. राजकारणातील अतिशय नम्र नेता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. थोरात यांच्यावर सुरूवातीपासून काँग्रेस पक्षाने कायम विश्वास दाखवला. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली. दरम्यान राज्याचे नेतृत्व करीत असताना त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातही काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांचे पक्षातील तसेच जिल्ह्यातील पक्षांतर्गत विरोधक राहिले. दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुक प्रचाराच्या वेळी  संगमनेर येथे मुक्काम केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर राज्याच्या  नेतृत्वाची धुरा सोपवली जाणार हे निश्चित झाले होते. त्याचबरोबर त्यांची विधिमंडळाच्या नेतेपदी ही निवड करण्यात आली. एकंदरीतच अशोकराव चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर थोरात यांच्या नावावर दिल्लीच्या नेतृत्वाने शिक्कामोर्तब केला होता. शनिवारी थोरात हे महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील अशी घोषणा करण्यात आली. एकंदरीतच राज्याचेच नव्हे तर देशाचे वातावरण पाहता ते भाजपमय  झालेले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळाले नाही. महाराष्ट्रात पक्षाची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. फक्त एकच जागा हाताच्या पंजावर निवडून  आलेली आहे. येत्या दोन-तीन महिन्यात विधानसभेचे निवडणूक येवू  घातलेली आहे. त्याचबरोबर पक्षातून आउट गोइंग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची काँग्रेस पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. राज्यात पक्षाला पूर्वीचे दिवस प्राप्त करून देण्याबरोबरच काँग्रेसमध्ये सुरू असलेली गळती थांबवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. 
अहमदनगर मध्ये राधाकृष्ण विखे यांचे मोठे आव्हान
दरम्यान अहमदनगर मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा दबदबा आहे. त्यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे नगर दक्षिण मधून खासदार झाले आहे. त्याचबरोबर विखे पाटील विरोधी पक्षनेत्याचे थेट गृहनिर्माण मंत्री झाले आहेत. त्यांच्या पत्नी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. एकंदरीतच विखे पाटील यांचा जिल्ह्यातील वारू रोखण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर असणार आहे.