नवी मुंबईतील तीन उपायुक्तांची इतरत्र बदली

डॉ. सुधाकर पठारे, तुषार दोषी आणि राजेश बनसोडे यांचा समावेश’
नवी मुंबई  /प्रतिनिधी:- राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ – 1 चे उपायुक्त डाॅ. सुधाकर पठारे, गुन्हे शाखेचे डॉ. तुषार दोषी , आणि मुख्यालयाचे उपायुक्त राजेश बनसोडे यांचाही समावेश आहे. या तीनही अधिकाऱ्यांची अनुक्रमे  राज्य गुप्तवार्ता विभाग, मरोळ प्रशिक्षण केंद्र आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागामध्ये बदली करण्यात आली आहे.
डॉ. सुधाकर पठारे यांनी नवी मुंबईतील परिमंडळ एक मध्ये उपायुक्त म्हणून अतिशय चांगली कामगिरी केली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात पन्नास पेक्षा जास्त गुन्हेगारांना तडीपार करणारे ते एकमेव पोलीस उपायुक्त होय. गुन्ह्यांच्या उकली बरोबरच गुन्हे घडू नयेत यासाठी त्यांनी विविध उपाययोजना केल्या. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करीत नवी मुंबईतील गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा बसवला. याव्यतिरिक्त नवी मुंबई परिसरात एकोपा नांदण्याचा दृष्टिकोनातून त्यांनी पोलीस आणि जनते मधला संवाद वाढवला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम त्यांनी अतिशय सक्षमपणे केले. त्या अगोदर मुख्यालयाचा कारभार पाहताना त्यांनी बाबूगिरी ला चाप बसवला. डाॅ पठारे यांची  गृह विभागाने राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबईच्या पोलीस उप आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेची अतिशय समर्थपणे धुरा सांभाळण्याचे काम पोलीस उपायुक्त डाॅ तुषार दोषी  यांनी केले. त्यांच्या कार्यकाळात अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल झाली. त्याचबरोबर एका खतरनाक गुन्हेगाराला पकडण्यात त्यांना  यश मिळाले. याव्यतिरिक्त कळंबोली बॉम्ब प्रकरणाच्या तपासात डॉ दोषी  यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मितभाषी, शांत स्वभाव, त्याचबरोबर सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी यामुळे तुषार दोषी  यांची अधिकारी आणि कर्मचारी वर्गामध्ये एक वेगळी इमेज होती. त्यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ च्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिस मुख्यालयाचे उपायुक्त राजेश बनसोडे यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे च्या पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे.
नवी मुंबईला तीन नवीन पोलीस उपायुक्त
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ सचिवालयाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रवीण पाटील यांची नवी मुंबई गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोंदियाच्या पोलीस अधीक्षक विनिता साहू या मुख्यालयाची जबाबदारी सांभाळतील. त्याचबरोबर या अगोदर उपायुक्त म्हणून नवी मुंबईत काम केलेले सुरेश कुमार मेंगडे यांची या ठिकाणी बदली झाली आहे. ते यापूर्वी नागरी संरक्षण विभागाचे अधीक्षक म्हणून काम पाहत होते.