पं. दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा जिल्ह्यात प्रारंभ

सर्व पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ द्या

पालकमंत्री प्रा, राम  शिंदे यांचे निर्देश 

अहमदनगर /प्रतिनिधी  प्राधान्य आणि अंत्योदय योजनेतील कोणताही लाभार्थी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार वंचित राहणार नाही, याची दक्षता घेऊन प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत शिधापत्रिका आणि उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅसजोडणी देण्यात यावी, असे निर्देश राज्याचे पणन वस्त्रोद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते पंडीत दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, जिल्हास्तरीय दक्षता समिती सदस्य डॉ. स्मिता तरटे, श्रीमती अश्विनी थोरात, जगन्नाथ निंबाळकर, अॅड. विलास थोरात, अन्नधान्य वितरण अधिकारी किरण सावंत पाटील आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, पं. दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेचा आजपासून जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे. येत्या १४ ऑगस्टपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार सर्व पात्र कुटुंबांना शंभर टक्के शिधापत्रिकांचे वाटप आणि सर्व कुटुंबांना शंभर टक्के गॅसजोडणी दिली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आपला जिल्हा केरोसिनमुक्त झाला असून ज्या नागरिकांना गॅसजोडणी हवी आहे, त्यांना ती तात्काळ मिळते, असे सांगून प्रा. शिंदे म्हणाले, नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन या केरोसीनमुक्त जिल्हा आणि धूरमुक्त अभियानात सहभाग घ्यावा. जे नागरिक गरजू आहेत आणि या लाभापासून वंचित आहेत, त्यांना या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी या मोहिमेत प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी पुरवठा विभागाला केली.

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे, जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी आणि मान्यवरांच्या हस्ते उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत चंदा कांबळे, सिंधू पाडळे, प्रिया साळवे, शोभा सौदागर, माया खंडागळे, हिराबाई पोटे यांना प्रातिनिधीक स्वरुपात गॅस कीटचे वाटप करण्यात आले. तसेच नवीन केशरी शिधापत्रिकांचे वाटप पौर्णिमा कर्डक, जयश्री गेरंगे, अनिता माने, सविता भोकरे, रमेश नेटके यांना करण्यात आले. याशिवाय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशोक देशमुख, शोभा पाठक, हिराबाई कदम, मंदोदरी गायकवाड, विजय मुळे यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देण्यात आले. पं. दीनदयाळ उपाध्याय अभियानादरम्यान रत्ना तुम्मेवार, राजेंद्र साबळे, इराबत्तीन अविनाश यांना प्रातिनिधीक स्वरुपात अंत्योदय योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात लाभ देण्यात आला.

या अभियान कालावधीत आवश्यक त्या कागदपत्रांसह आपल्या जवळील स्वस्त धान्य दुकानदार, गॅस एजन्सी आणि आवश्यकता असल्यास जवळच्या क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांशी संपर्क साधावास असे आवाहन यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात या अभियान कालावधीत १ लाख ६० हजार पात्र नागरिकांना गॅस जोडणी देण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. आभार अन्नधान्य वितरण अधिकारी श्री.सावंत-पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.