म्हसके  वाडी ,आळकुटी येथे होणार जलसंधारण

तीन कोटी खर्च करून कोल्हापूर पद्धतीचे चार बंधारे बांधणार
मृदा व जलसंधारण विभागाकडून प्रशासकीय मान्यता
पारनेर तालुक्यावर राज्यशासन मेहरबान
नाना करंजुले
मुंबई/ प्रतिनिधी: – विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या पारनेर नगर मतदारसंघात राज्य शासनाने विविध विकास कामे आणि योजनांकरिता निधीची लयलूट केली जात  आहे. गुरुवारी म्हसके वाडी  आणि अळकुटी  या ठिकाणी राज्य शासनाने कोल्हापूर पद्धतीच्या 4 बंधाऱ्यांना मंजुरी दिली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे या दोनहीव गावांमध्ये जलसंधारण होणार आहे. त्याचा फायदा आजूबाजूच्या शिवाराला होईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी बंधारे बांधण्यात येत आहेत. पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघातही अशाप्रकारे काही  ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. पारनेर तालुक्यातील म्हसकेवाडी  आणि अळकुटी या दोन गावांमध्ये ही येथे  वाहणाऱ्या ओढ्यांवर कोल्हापूर पध्दतीचे  बंधारे बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. लघुसिंचन अंतर्गत जलसंधारण विभागाकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याबाबत स्थानिक आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा केला होता. या कामांच्या  आराखड्याला लवकरात लवकर मंजुरी देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी चारही बंधाऱ्यांचे अंदाजपत्रक व आराखड्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता तथा सहसचिव वि. म. देवराज यांच्या सहीने आदेश जारी करण्यात आला आहे.
दरम्यान दोनही  गावांमध्ये प्रत्येकी दोन बंधारे बांधले जाणार आहेत. कोल्हापूर   पद्धतीचा येथे अवलंब केला जाणार आहे. यामुळे पावसाचे पाणी अडवून ते बंधार्‍यामध्ये साठवले जाणार आहे. जेणेकरून त्या पाण्याचा वापर म्हसके वाडी  आणि अळकुटी येथील ग्रामस्थांना करता येणार आहे. बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी त्याच ठिकाणी जिरवता येणार आहे. परिणामी आजूबाजूच्या भूजल पातळीमध्ये वाढ होणार आहे. त्याचा फायदा कूपनलिका आणि विहिरींना होणार आहे.
बंधाऱ्याचे ठिकाण              खर्च
म्हसकेवाडी  (संगम  )             81, 83, 226
म्हसके (बोकारी)           78, 20, 374
अळकुटी (माने वस्ती )        59, 88, 867
अळकुटी (जाधव वाडी )       82, 27, 115
एकूण                             3, 2 0, 19, 622
शंभर हेक्टर पेक्षा जास्त सिंचन क्षमता
 कोल्हापूरच्या धर्तीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांमुळे 108 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली  येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हसके  संगम आणि अळकुटी जाधव वाडी या बंधाऱ्यात खाली प्रत्येकी 29 सेक्टर सिंचन क्षमता असणार आहे. तर म्हसकेवाडी  भोकारी आणि अळकुटी माने वस्ती येथे बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांची सिंचनक्षमता अनुक्रमे 28 आणि 22 हेक्टर क्षेत्र इतकी असणार आहे.