चौदा हजाराने घेतला तीन भंगार कामगारांचा बळी

शिवीगाळ आणि मारहाणीमुळे घडला तुर्भे हत्याकांड
नवी मुंबईच्या विशेष तपास पथकाकडून गुन्ह्याची उकल
नवी मुंबई /प्रतिनिधी: – 12 जुलै रोजी तुर्भे येथील एका भंगाराच्या दुकानात काम करणाऱ्या तीन कामगारांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यांचा नवी  मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने उलगडा केला. याप्रकरणी दोन आरोपींना मध्यप्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुख्य
आरोपी या अगोदर यास भंगार दुकानात काम करीत होता. त्याला मालक व  मयत कामगाराने शिवीगाळ व मारहाण केली होती. त्याचबरोबर त्याचे 14,000 रुपये सुद्धा बाकी ठेवण्यात आले होते. ते मागण्यासाठी परत आल्यानंतर ही आरोपीला पुन्हा मारहाण करण्यात आली. हा राग मनात ठेवून तुर्भे येथील हत्याकांड घडला असल्याची माहिती पुढे आली आहे.
12 जुलै च्या रात्री तुर्भे एमआयडीसीयेथील एका भंगाराच्या दुकानात काम करणाऱ्या राजेश कुमार देवनारायण पाल (30), इरशाद जव्वाद  खान (20), नौशाद जव्वाद खान (19) यांची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. त्याचबरोबर कपाटातील दोन लाख रुपयांचीही चोरी केली होती. याबाबत तुर्भे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या हत्याकांडामुळे तुर्भे परिसर हादरून गेला . नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी एका विशेष पोलीस तपास पथकाची स्थापना केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई, गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, शिरीष पवार, सुनील शिंदे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सचिन मोरे, राहुल राख, दीपक डोंब, उपनिरीक्षक विजय चव्हाण, योगेश वाघमारे, सुनील सावंत, सम्राट वाघ, टेंगले, गाढवे, वाघमारे, फरताडे, शिरस्कर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान आरोपींनी फारसा सुगावा पाठीमागे ठेवला नव्हता. त्याचबरोबर मोबाईल सुद्धा बंद असल्याने गुन्ह्याची उकल करणे त्या अनुषंगाने आव्हानात्मक होते. तरीसुद्धा संबंधित पथकाने तांत्रिक व  कौशल्यपूर्ण तपास करीत सात दिवसात सेबु हनीफ खान (25) आणि शेरु हनीफ खान (24) मूळ राहणार उत्तर प्रदेश, यांना मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.
हे आहे हत्येचे कारण
दरम्यान आरोपी सेबु खान याच भंगाराच्या दुकानात कामाला होता. दोन महिन्यापूर्वी दुकान मालक व मयत राजेशकुमार पाल यांनी त्याला मारहाण केली. त्याचबरोबर त्याचे 14 हजार रुपये दिले नाहीत. दरम्यान ही घटना घडण्याच्या अगोदर सेबु या ठिकाणी आला होता. त्याने आपली उर्वरित रक्कम मागितली असता पालने  पुन्हा त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. हाच राग मनात ठेवून 12 जुलै रोजी मध्यरात्री आरोपींनी राजेश याच्यावर झोपेतच धारदार शस्त्राने वार केले. त्यावेळी झोपेत असलेले इतर दोघेही जागे झाले. आपले पितळ उघडे पडेल म्हणून आरोपींनी या दोघांचाही खून केला.
दोघा भावांनी दोघा भावांना मारले
मयत नौशाद आणि इरशाद हे दोघे सख्खे भाऊ होते. त्यांचा या प्रकरणात बळी गेला. आरोपी सेबु आणि शेरू हे दोघे सुद्धा भाऊ आहेत. या दोघांनी मिळून तिघा कामगारांचा काटा काढला.पोलीसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
नवी मुंबई पोलिसांची उत्तम कामगिरी
कळंबोली येथील बॉम्ब प्रकरणाचा छडा लावल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी तुर्भे हत्याकांडाची ही सात दिवसात उकल केली. या दोन्ही तपासामध्ये गुन्हे शाखेचे कक्ष क्रमांक तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने तसेच शिरीष पवार यांनी सहभाग नोंदवला. तपासामध्ये कादबाने यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत वरिष्ठांनी सोपविलेली कामगिरी यशस्वी करून दाखवली.