आत्महत्येच्या प्रयत्नाला वाहतूक पोलिसांचे जीवदान

वाशी खाडीत जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला वाचवले
वाशी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची सर्तकता  कामी आली
नवी मुंबई / प्रतिनिधी: – वाशी खाडीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचा जीव वाहतूक पोलिसांनी वाचवला. संबंधित महिला ही चेंबूर येथील रहिवासी असून कौटुंबिक वादामुळे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिला जीवदान मिळाले. याअगोदरही वाशी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जूईनगर येथील एका महिलेचा जीव वाचवला होता.
चेंबूर येथील कुसलुम प्रवीण बोनुखान (21)  या महिला मंगळवारी पाच वाजण्याच्या सुमारास वाशी खाडी पुलालगत असलेल्या वाहतूक शाखेच्या चौकीच्या पाठीमागे आत्महत्या करण्याचा प्रयत्न होते. हे ट्रॅफिक वॉर्डन सचिन पवार यांच्या दृष्टीक्षेपास पडले. त्यांनी याबाबत वाशी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सूर्यकांत बारस्कर यांना माहिती दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस नाईक शिवाजी बसरे, पोलीस शिपाई दर्शन म्हात्रे आणि वार्डन पवार यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संबंधित महिला सेल्फी घेऊन आपले म्हणणे रेकॉर्डिंग करीत होती. ‘अभी मै खुशी कर रही हू ‘!असे म्हणत असताना बारस्कर  आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला खाडीत उडी मारण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तिची विनवणी ही पोलिसांनी केली. परंतु कुसलुम हीने आपल्या हातातील मोबाईल बाजूच्या झाडीत फेकून खाडीत उडी मारली. पोलिस कर्मचाऱ्यांनी लागलीच खाली उतरून तिला बाहेर काढले. सुदैवाने संबंधित महिलेला कोणतीही इजा झाली नाही. दरम्यानच्या काळात वाशी पोलिस ठाण्यात संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी खाडी पुलाकडे धाव घेऊन संबंधित महिलेला ताब्यात घेतले. दरम्यान नवी मुंबई ,वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दुसऱ्यांदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलाचा जीव वाचवून धाडसी कामगिरी केली. त्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यां बरोबरच नागरिकांनीही संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.