बारामतीच्या रोहित पवारांचा कर्जत जामखेड मध्ये तळ

छोट्या दुकानदारांपासून गावोगावी संपर्क अभियान
विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी
अहमदनगर/ प्रतिनिधीः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात तळ ठोकला आहे. लहान मोठ्या दुकानदारांपासून ते गावोगावी जणूकाही संपर्क अभियानच त्यांनी सुरू केले आहे. बारामतीच्या पवारांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज अहमदनगर चे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा इरादा पक्का केल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे रीतसर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. पूर्वी हा मतदारसंघ राखीव असल्याने शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी तीनदा प्रतिनिधित्व केले. त्यानंतर प्रा. शिंदे आमदार झाले. वास्तविक पाहता कर्जत जामखेड हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या ठिकाणी पवार कुटुंबियातील रोहित आपले भविष्य अजमवण्याच्या  तयारीत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कर्जत जामखेड मध्ये त्यांचा वावर वाढला आहे. त्यांची गाडी बारामतीहून अहमदनगरच्या पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात येते. वास्तविक पाहता शरद पवार यांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे या पार्श्वभूमीवर त्यांनी हा मतदार संघ निवडला आहे. यासाठी  आपला पुणे जिल्हा सोडून थेट अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत पार्थ अजित पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. आघाडीला सुगीचे दिवस असताना पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव होता. महानगरपालिकेवर घड्याळाची सत्ता होती. या  सर्व गृहितकांवर पार्थ यांना खासदार करता येईल असे आडाखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बांधले होते. पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळमधून शिवसेनेचे  श्रीरंग बारणे यांनी पार्थ यांचा दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. प्रत्यक्ष पवार कुटुंबियांना पहिल्यांदा निवडणुकीत हार स्वीकारावी लागली. पार्थ यांच्या पराभवाने  रोहित यांची वाट काही प्रमाणात बिकट झाली. परंतु लोकसभा आणि विधानसभेचे गणित वेगळे असतात. त्याचबरोबर मतदारसंघातील अनुकूलता प्रतिकूलता ही सारखी नसते या गृहीतकांच्या आधारांवर बारामतीचे रोहित पवार अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या दुष्काळी मतदारसंघात आपल्या राजकीय सुकाळाची स्वप्न पाहताना दिसत आहेत. त्यांनी या मतदारसंघात या अगोदर पाण्याचे टॅंकर सुरू केले आहेत. गावोगावी जाऊन पवार लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. तरुण वर्गाला आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून ते वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. दोन दिवसापूर्वी जामखेड येथील सलून मध्ये जाऊन त्यांनी सेविंग करून घेतली. त्याचबरोबर कर्जत येथील छोट्या दुकानदारांच्या गाठीभेटी घेतल्या. चहाच्या टपरीवर येथील तरुणांसोबत चहा बिस्किट घेतले. वयोवृद्ध मंडळींच्या हातात हात घेऊन त्यांची खुशाली विचारणारे रोहित यांचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केली जातात. वास्तविक पाहता प्रा. राम शिंदे यांनी या मतदारसंघात केलेली विकास कामे, भारतीय जनता पक्षाची असलेली ताकद, आणि सध्या विरोधकांची झालेली पीछेहाट , काँग्रेस जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी व राष्ट्रवादीच्या  महिला अध्यक्ष यांनी या मतदारसंघावर केलेला दावा या सर्व गोष्टी रोहित पवारांच्या  उमेदवारीला अडथळा निर्माण करणाऱ्या आहेत. परंतु कर्जत जामखेड मधूनच आपल्याला उमेदवारी मिळणार याबाबत पवार यांच्या मनामध्ये कमालीचा आत्मविश्वास दिसून येत आहे. याचे मुख्य कारण असे की काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मधील असलेले सलोख्याचे संबंध होय.
पवारांच्या विरोधात प्रा .शिंदे यांच्या अगोदरच डॉ विखे यांनी दंड थोपटले
दरम्यान पवार आणि विखे कुटुंबीय यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. डॉ. सुजय विखे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ सोडला नाही. त्यामुळे डॉ. विखे यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. आणि मोठ्या फरकाने विजय संपादन केला. दरम्यान पवारांना नामोहरण करण्याकरीता विखे कोणतीही संधी सोडणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. रोहित पवारांनी कर्जत -जामखेड मध्ये निवडणूक लढवूनच दाखवावी पार्थ  पवारांपेक्षा जास्त हलत त्यांची करू असे आव्हान डॉ सुजय विखे यांनी दिले आहे. पालकमंञ्यांना   निवडून आणण्याची जबाबदारी माझी असल्याचे  सांगत प्रा .राम शिंदे यांच्या अगोदरच  डाॅ .विखे यांनीच पवारांच्या विरोधात एक प्रकारे दंड थोपटले आहेत.