मनपाच्या प्रत्येक कामगाराच्या वेतनात सात हजारांचा गाळा?

मोठा  अपहार  होत असल्याचा आरोप ?
ठेकेदाराच्या देयकावर 23564 मात्र वेतन चिठ्ठीवर 16522   
आझाद कामगार संघटनेकडून मनपा आयुक्तांना पत्र

पनवेल /प्रतिनिधी: – पनवेल महानगर पालिकेचे जवळपास सोळाशे कामगार विविध सुविधांपासून वंचित असल्याच्या कारणावरून आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्याचबरोबर त्यांनी या कामगारांच्या वेतनात एकूण सात हजार रुपयांची तफावत असल्याचे सांगत यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप केला आहे. ठेकेदाराच्या देयकावर 23564 इतक्या रकमेची नोंद असताना. कामगारांच्या पगार चिठ्ठीवर मात्र16522 इतक्यात रकमेचा उल्लेख असल्याने वाघमारे यांचे म्हणणे आहे. त्यांनी याविषयी सर्व कागदपत्रासह महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे . याबाबत योग्य ती कारवाई  करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

पनवेल महानगरपालिकेने गेल्यावर्षी घनकचरा व्यवस्थापन सिडकोकडून आपल्याकडे घेतले आहे. त्याअगोदरच साफसफाईचे कामही वर्ग झालेले आहे. दरम्यान मनपा हद्दीत ग्रामपंचायत आणि सिडकोकडून आलेले जवळपास दीड हजारांपेक्षा जास्त कामगार ठेकेदाराच्या मार्फत काम करीत आहेत. त्यामध्ये सफाई, घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, धूर फवारणी, वृक्ष प्राधिकरण, वाहन चालक व इतर कामगारांचा समावेश आहे. यांना साई गणेश इंटरप्राईजेस मार्फत किमान वेतन दरानुसार कामाचा मोबदला दिला जातो. त्यांना 31 दिवसाचा महिना असल्यास नियमानुसार 27 दिवसांचा पगार दिला जातो. पनवेल महापालिका ठेकेदारास त्याने सादर केलेल्या देयका प्रमाणे प्रत्येक कामगाराला प्रतिमहा 2356 4.80 इतकी रक्कम अदा केली जाते. मात्र संबंधित ठेकेदाराकडून कामगारास जी वेतन चिठ्ठी दिली जाते. त्यामध्ये 16522 इतकाच मूळ पगार म्हणून दाखवण्यात आला आहे. दरम्यान 7042.80 इतकी रक्कम कोणाच्या घशात आणि खिशात जाते असा सवाल कामगार नेते महादेव वाघमारे यांनी उपस्थित केला आहे. महापालिका ठेकेदाराला साडे तेवीस हजार रुपये आदा करते ,मग वेतन चिठ्ठीवर फक्त साडेसोळा हजारच कसे याचे उत्तर पनवेल महापालिकेने द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. ही अतिरिक्त रक्कम ठेकेदाराकडे असल्यास ती कामगारांना केव्हा मिळणार. तसेच ठेकेदाराकडे सुरक्षित राहते का याचा अपहार तर होत नाही ना असे अनेक प्रश्न आपल्या निवेदनामध्ये त्यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान कामगारांना दिल्या जाणाऱ्या वेतन चिठ्ठीवर ग्रेच्युटी, बोनस व इतर कारणासाठी होणाऱ्या कपातीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला पाहिजे असे मतही महादेव वाघमारे यांनी व्यक्त केले आहे. माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी ठेकेदाराची प्रत्येक कामगारानिहाय मागणी व आदा झालेली देयके मागितले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.31 चा महिना असल्यास ठेकेदार महापालिकेकडून 27 दिवसांचा पगार घेतो. परंतु प्रत्यक्षात कामगारांना 26 दिवसांचा मोबदला देत असल्याचा आरोपही आझाद कामगार संघटनेकडून करण्यात आला आहे.

“सफाई,घनकचरा, अतिक्रमण, धूरफवारणी,वृक्ष प्राधिकरण, वाहनचालक व इतर कामगारांना 31 दिवसाचा महिना असल्यास पनवेल महापालिका ठेकेदाराला 27 दिवसाचे 23564.80 एवढी रक्कम देते . परंतु ठेकेदारा कडून कामगारांना 16522 रुपये दिले जातात .कराराप्रमाणे ठेकेदाराचे 43 रुपये प्रतिदिन सेवाशुल्क सोडून 7042.80 इतक्या रुपयाचा फरक राहतो. इतकी मोठी रक्कम नक्की कुठे जातो त्याचे  स्पष्टीकरण महापालिकाने कामगारांना दिले पाहिजे.”

महादेव वाघमारे

अध्यक्ष

आझाद कामगार संघटना