सेनेच्या खांदा कॉलनी शहरप्रमुख पदी सदानंद शिर्के

लीलाधर भोईर यांची उपमहानगरप्रमुख पदी वर्णी 
पनवेल/ प्रतिनिधी: – शिवसेनेच्या खांदा वसाहत शहर प्रमुखपदी कट्टर शिवसैनिक सदानंद शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान शहर प्रमुख लीलाधर भोईर यांना उपमहानगरप्रमुख पदी बढती देण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने या नियुक्‍त्या झाल्या आहेत.
पक्षाची खांदा वसाहतीतील धुरा लीलाधर भोईर यांनी एक दशकांपेक्षा जास्त काळ सांभाळली आहे. त्यांनी शहरात चांगले काम केले. त्यामुळे त्यांना महानगर स्तरावर काम करण्याची संधी पक्षांनी दिले आहे. त्यांच्या जागी उपशहर प्रमुख सदानंद शिर्के यांची वर्णी शिवसेनेने लावली आहे. शिर्के  पूर्वी मुंबई घाटला येथे आमदार तुकाराम काते यांच्यासमवेत शिवसेनेचे म्हणून काम केलेले आहे. अतिशय कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. खांदा वसाहतीत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणीही शिवसेनेचा भगवा हातात घेत पक्ष वाढीचे काम केले. शिर्के यांनी पनवेल महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा लढवली. त्यांचा वसाहतीत दांडगा जनसंपर्क आहे. सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा शिवसैनिक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे.14 वर्षांपूर्वी 26 जुलै रोजी  महापुरात अनेकांचे संसार वाहून गेले असताना किराणा दुकानदार चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करत असताना सदानंद शिर्के यांनी  शिवसैनिकांना बरोबर घेऊन दुकानदारांना वठणीवर आणले. जुन्या झालेल्या सिडको इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. खांदा वसाहतीतील पायाभूत सुविधांसाठी सदानंद शिर्के सिडकोकडे सातत्याने पत्र व्यवहार करतात. त्यांच्या या कामाची पावती म्हणून शिवसेनेने शिर्के यांच्या कडे शहर प्रमुखाची जबाबदारी सुपूर्द केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले आहे.