भालचंद्रा चे अर्धशतक

चंद्र हा सर्वांनाच आवडतो, तो सूर्या इतका प्रखर नसला तरी काळोखात सुद्धा उजेड करून इतरांना मार्ग दाखवतो. त्याचप्रमाणे आपल्या मित्रांना कठीण प्रसंगी, अडचणीच्या वेळी मदतीचा हात देणारे भालचंद्र जुमलेदार यांनी आपल्या वयाचे अर्धशतक पूर्ण केले आहे. गेल्या पाच दशकात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. आव्हानात्मक जीवन जगत असताना इतरांनाही त्यांची आव्हान पेलण्यासाठी मदत करणारा असा संवेदनशील मित्र सर्वांनाच मिळतोच असे नाही. अकस, सूडभावना, वैर, कोणाबद्दल वाईट विचार या माणसाच्या मनात कधीच आले नाहीत. सरळ आणि अगदी पारदर्शक स्वभाव, कोणाच्याही मदतीला धावून जाणारा भला माणूस म्हणून जुमलेदार यांची एक वेगळी इमेज आहे. पनवेलची पत्रकारिता आणि बाळू जुमलेदार हे समीकरण गेल्या दोन दशकांपासून कायम राहिलेले आहे. पत्रकारिता करीत असताना सोर्स, विश्वासहर्ता, मेहनत, चिकाटी आणि जिद्द या गोष्टी आवश्यक आहेत. त्याशिवाय या क्षेत्रात यशस्वी होता येत नाही. रात्री-अपरात्री कधीही उठून फिल्डवर जाण्याची तयारी असावी लागते. हे सगळ आहे, जुमलेदार यांच्यामध्ये, उत्साहाचे रोल मॉडेल म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्याकडे पाहतो. सहकारी म्हणून बाळू जुमलेदार हे उत्तम आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम करीत आहोत. त्यांच्याकडे विषयांचा खजिना असतो, पनवेल परिसरात एखादी घटना घडली आणि ती जुमलेदार यांना समजले नाही असं फारसं कधी होत नाही. याचा अर्थ त्यांचाव दांडगा जनसंपर्क आहे. पनवेलचे हे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. सफाई कामगारापासून ते आमदारांपर्यंत सर्वजण बाळू जुमलेदार यांना ओळखतात. या माणसांमध्ये कधीच कोणताही स्वार्थ दिसला नाही. यातून आपल्याला हे मिळेल ते मिळेल असे त्यांना कधीच वाटत नाही. फक्त काम करीत राहायचं, समस्यां तसेच प्रश्नांना वाचा फोडायची, प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायचे, सर्वसामान्यांचे हित जोपासायचं हे ध्येय आणि उद्दिष्ट घेऊन भालचंद्र जुमलेदार मार्गक्रमण करीत आहेत. एखाद्याशी मैत्री चे नाते जोडले की त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा हा त्यांचा स्वभाव अधिक भावनारा आहे. त्यामुळे गेल्या एक-दीड दशकांमध्ये जुमलेदार आणि माझ्यात कधीच मतभेद झाले नाहीत. लहान भावाप्रमाणे त्यांच्याकडून माझा सांभाळ झाला आहे. अशा या मोठ्या भावाला, मित्राला तसेच सहकाऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

नाना करंजुले