मुसळधार पावसातही नवीन पनवेलचा घसा कोरडा

माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांची सिडकोवर धडक
उपाययोजना  करण्याचे पाणीपुरवठा विभागाचे आश्वासन
पनवेल/ प्रतिनिधी :-काही दिवसापासून पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत  आहे.त्यामुळे  नवीन पनवेलच्या अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. परंतु दुसरीकडे वसाहतीत कमालीची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मागणीप्रमाणे पाणी येत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या समस्येने त्रस्त असलेल्या नवीन पनवेल करांनी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मोर्चा काढून सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला याबाबत जाब विचारले. पाटील यांनी याविषयी अधीक्षक अभियंता पी बी काळे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून नवीन पनवेल करांची व्यथा मांडली. याबाबत त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नवीन पनवेल नोडला नऊ हजार ग्राहक आहेत. या ठिकाणी 42 एमएलडी पाण्याची गरज आहे. परंतु सद्यस्थितीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 25 ते 28 एम एल डी इतकेच पाणी सिडकोला मिळते. त्यामुळे शहराची तहान भागवण्यासाठी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वायाळ येथील उपसा केंद्रावर विजेचा लपंडाव सुरू  होता. त्यामुळे त्याचा परिणाम नागरी वसाहतीतील पाणी पुरवठ्यावर झाला. त्याचबरोबर पंप बिघडल्याने  अडचणीत आणखीच भर पडली. त्यामुळे पाणीपुरवठा हा 19 एमएलडीवर आला. परिणामी सेक्टर 13, 14, 17, 18, या ठिकाणी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. ए टाइप मधील घरांमध्ये शनिवारी पावसाचे पाणी शिरल्याने त्रेधातिरपिट उडाली. त्याचबरोबर बांठिया हायस्कूल समोरील रस्ता जलमय झाला होता. एकिकडे  धो धो पाऊस पडत असताना नवीन पनवेलकरांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी सिडको कार्यालय गाठले. पाणी येत नसल्यामुळे त्यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सहाय्यक अभियंता राहुल सरोदे यांनी शिष्टमंडळासमोर वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर पाटील यांनी अधीक्षक अभियंत्याबरोबर  बरोबर चर्चा केली. दरम्यान या परिसराला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा यासाठी 150 मीटर नवीन जलवाहिनी टाकून देण्याची ग्वाही  पी .बी .काळे यांनी दिली.
एमजेपीच रडगाणे सुरूच
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जुनाट झालेली जलवाहिनी बदलण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्याचबरोबर उपसा आणि जलशुद्धीकरण केंद्राला  अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र फिडर चा प्रस्ताव आहे. परंतु तोसुद्धा कागदावर असल्याने विजेचा प्रश्न सुटलेला नाही. वारंवार बिघडणारे पंप हेही अपुऱ्या पाणीपुरवठ्याला जबाबदार आहेत. जोपर्यंत ही यंत्रणा बदलली जाणार नाही. तोपर्यंत हे असेच रडगाणे सुरू राहणार आहे. दरम्यान सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला नागरिकांना उत्तर देताना नाकी नऊ येऊ लागला आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून ?असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सिडकोला एमजेपी कडून कमी पाणी येत असल्याने ते ग्राहकांना नियमित आणि मुबलक देणार कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खांदा कॉलनी ही तहानलेलीच
नवीन पनवेलचा पश्चिम भाग म्हणजेच खांदा कॉलनी होय. गेल्या आठवड्याभरापासून येथेही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विशेष करून सेक्टर 7 परिसरात पाणीच येत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. यासंदर्भात स्थानिक नगरसेविका सीताताई सदानंद पाटील यांनी सिडको आणि महापालिकेला निवेदन सादर केले आहे. गेल्या एक दोन दिवसापासून या भागात रात्री पाणी सोडले जात असल्याने रहिवाशांना जागरण करावे लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले. याबाबत त्वरित सिडकोने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.