बेलापूर मधून आ. मंदा म्हात्रे यांनाच तिकिट 

नाईकांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा शब्द
नवी मुंबई/ प्रतिनिधी:- ऐरोली चे आमदार संदीप नाईक यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. लवकरच गणेश नाईक सुद्धा कमळ हातात घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. असे असले तरी बेलापूर मधून मलाच  उमेदवारी दिली जाणार असल्याचे मंदा म्हात्रे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत आपल्याला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असल्याचे त्या म्हणाल्या.
नवी मुंबई आमदार मंदा म्हात्रे या गणेश नाईक यांच्या कट्टर विरोधक मानल्या जातात. राष्ट्रवादीत असतानाही या दोनही  नेत्यांमध्ये पक्षांतर्गत कुरघोडी सातत्याने सुरू होती. 2014 ला म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. बेलापूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला. गेल्या पाच वर्षातही नाईक विरूध्द  म्हात्रे असा राजकिय संघर्ष नवी मुंबईत पाहायला मिळाला.गेल्या  काही दिवसापासून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून खलबते सुरू होते. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवाहाच्या बाजूने जाण्याकरिता  दबाव वाढवला. त्यानुषंगाने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे, पणन व वस्त्रोद्योग मंत्री प्रा. राम शिंदे, गृहमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संदीप नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांनी आपल्या हातामध्ये कमळ घेतले. दरम्यान नाईकांच्या भाजप प्रवेशला आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हात्रे यांची भेट घेतली. त्याच बरोबर आमदार मंदा म्हात्रे यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. बुधवारी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आमदार म्हात्रे यांनीही हजेरी लावली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया विचारले असता, जनाधार कमी झाला तसेच  निवडून येण्याची शक्यता कमी झाली. याच कारणाने नाईक भाजपात येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. मी प्रामाणिकपणे काम करीत आहे, जनता माझ्यासोबत आहे त्यामुळे मला काहीच अडचण नसल्याचे ही त्या म्हणाल्या. माझ्या मतदारसंघात मी उमेदवार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आहे असेही  आमदार म्हात्रे यांनी सांगितले. त्यामुळे या मतदारसंघातून ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना निवडणूक लढवता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना विधानसभे करिता दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
ऐरोली मधून संदीप नाईकच
दरम्यान ऐरोली विधानसभा मतदार संघातून मागील निवडणुकीत वैभव नाईक यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती. तर शिवसेनेच्या वतीने विजय चौगुले यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले होते. परंतु याठिकाणी संदीप नाईक यांनी बाजी मारली होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांना निवडणूक आखाड्यात उतरवले जाणार आहे.