पांडवकडा परिसरातून चार जण वाहून गेले

एका युवतीचा मृतदेह सापडला
पनवेल प्रतिनिधी: – शनिवारी खारघर येथील पांडवकडा परिसरात चार जण वाहून गेल्याचे वृत्त आहे. त्यापैकी एका तरुणीचा मृतदेह सापडला असल्याचे समजते. बंदी असतानाही पर्यटक या ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालत असल्याचे या दुर्घटने वरून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
खारघर आणि बेलापूर दरम्यान ही  डेकडी असून त्याला पांडवकडा असे संबोधले जाते. पावसाळयात या ठिकाणीहून खाली पावसाचे पाणी पडत असल्याने येथे नैसर्गिक  धबधबा तयार झाला आहे.अतिशय मनमोहक असे निसर्गाचे रूप  पाहण्यासाठी पावसाळयात  पर्यटक या ठिकाणी येतात. मुंबई, ठाणे आणि , रायगडामधील पर्यटकांना हा धबधबा साद घालतो. पावसात भिजत वरतून पडणाऱ्या फेसाळलेले  पाणी पाहण्याची मजा काही औरच असते. मात्र असे असले तरी हे  ठिकाण धोकादायक असल्याने पर्यटनासाठी आलेल्या अनेक जणांचा प्राण गमवावा लागल्याची  नोंद आहे. डोंगराच्या कडयातून अतिशय वेगाने पडणारे पाणी खूप जोरात खाली वाहत जात असल्याने अनेकदा पर्यटकांना त्याचा अंदाज येत नाही.  त्यामुळे काहींचा  वाहून जावून मृत्यू झाला. मोठया प्रमाणात जीवीत हानी होत असल्याचे पाहून पावसाळयात या ठिकाणी येण्यास पर्यकांना मनाई करण्यात येत आहे.काहींवर खारघर पोलीसांनी कायदेशीर कारवाई सुध्दा केली आहे. तरीसुद्धा शनिवारी सकाळी आठ वाजता नवी मुंबई आणि मुंबईतील काही महाविद्यालयीन तरुण तरुणींना ग्रुप पांडवकडा परिसरात बंदी झुगारून गेला. दरम्यान डोंगरावरून अचानक पाण्याचा फ्लो आल्याने त्यामध्ये चार जण वाहून गेले. पैकी चेंबूर येथील नेहा जैन या युवतीचा मृतदेह आढळला असल्याचे समजते. दरम्यान या दुर्घटनेची माहिती समजताच खारघर पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. वाहून गेलेल्या इतर तीन जणांचा शोध सुरू आहे.