खारघर चा ‘मृत्यू’ कडा

नाना करंजुले
खारघर आणि बेलापूर दरम्यानच्या   डेकडीला  पांडवकडा  असे संबोधले जाते. पावसाळयात या ठिकाणीहून खाली पावसाचे पाणी पडत असल्याने येथे नैसर्गिक  धबधबा तयार झाला आहे.अतिशय मनमोहक असे निसर्गाचे रूप  पाहण्यासाठी पावसाळयात  पर्यटक या ठिकाणी येतात. मुंबई, ठाणे आणि , रायगडामधील पर्यटकांना हा धबधबा साद घालतो. पावसात भिजत वरतून पडणारे  फेसाळलेले  पाणी पाहण्याची मजा काही औरच असते. मात्र असे असले तरी हे  ठिकाण धोकादायक असल्याने पर्यटनासाठी आलेल्या अनेक जणांचा  आपला प्राण गमवावा लागल्याची  नोंद आहे. डोंगराच्या कडयातून अतिशय वेगाने पडणारे पाणी खूप जोरात खाली वाहत जात असल्याने  पर्यटकांना त्याचा अंदाज येत नाही.  त्यामुळे काहींचा  वाहून जावून मृत्यू झाला. मोठया प्रमाणात जीवीत हानी होत असल्याचे पाहून पावसाळयात या ठिकाणी येण्यास पर्यकांना मनाई करण्यात येत आहे.काहींवर खारघर पोलीसांनी कायदेशीर कारवाई सुध्दा केली आहे. तरीसुद्धा शनिवारी सकाळी आठ वाजता नवी मुंबई आणि मुंबईतील काही महाविद्यालयीन तरुण तरुणींना ग्रुप पांडवकडा परिसरात बंदी झुगारून गेला. दरम्यान डोंगरावरून अचानक पाण्याचा फ्लो आल्याने त्यामध्ये चार महाविद्यालयीन युवती वाहून गेल्या. त्यापैकी तीन जणींचा मृतदेह सापडला . वास्तविक पाहता पांडवकडा परिसर हा विस्तीर्ण स्वरूपाचा आहे. बंदीमुळे तरुण-तरुणी प्रत्यक्षात धबधब्यावर जात नाहीत. परंतु आजूबाजूच्या परिसरात त्यांचा वावर सुरूच असतो. विशेष करून गोल्फ कोर्स, ओवे कॅम्प परिसरातून युवक-युवती पांडवकडा परिसरात मौज मजा करण्यासाठी जातात. गुरुद्वारा च्या भिंतीवर उड्या मारून ते डोंगराच्या आजूबाजूला जातात. वास्तविक पाहता खारघरच्या डोंगरावर मुसळधार पाऊस पडतो,आणि येथील पाणी अतिशय वेगाने खाली वाहत येते. अनेकदा पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने त्याचा अंदाज येत नाही. पावसात भिजण्याचा आनंद लुटण्या  करीता या ठिकाणी लपून छपून येणार्‍या बेधुंद तरुण-तरुणी पाण्यात उतरतात, मात्र प्रवाहाचा प्रतिकार त्यांना अनेकदा करता येत नाही. परिणामी वाहून जाण्याचा दुर्घटना घडतात. दरम्यान हा परिसर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करता येऊ शकतो. परंतु त्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. जोराने वाहणाऱ्या पाण्याला अटकाव घालण्यासाठी पक्के बंधारे, बांध बांधणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पावसाळी सहली करीता येथे येणारे पर्यटक पाण्यात  उतरू नयेत म्हणून रेलिंग लावण्याचाही प्रस्ताव आहे. याशिवाय या परिसरात वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करून वाहत्या पाण्याचा वेग कमी करता येऊ शकतो. अशा उपायोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. बाजूला सिडकोचे गोल्फ कोर्स, सेंटर पार्क, ड्रायव्हिंग रेंज आहे. परंतु पांडवकडा  परिसराच्या विकासाकडे सिडकोने डोळेझाक केली आहे. पांडव कड्याच्या आजूबाजूचा भाग हा वन विभागाकडे आहे. त्यामुळे सिडकोने याकामी आखडता हात घेतला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पांडवकडा मुळेच खारघरच्या वैभवात भर पडलेली आहे. त्यामुळे सिडको आणि वनविभागाने एकत्र येऊन येथे पावसाळी पर्यटन क्षेत्र विकसित करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. खारघर विकास समितीचे अध्यक्ष भूषण मात्रे यांनी नुकताच या आशयाचा प्रस्ताव दिला आहे. येथे सुरक्षित पर्यटन स्थळ विकसित झाले तर त्याचा फायदा आजूबाजूच्या आदिवासी वाड्या आणि पाड्यांना होईल. त्यांना येथे रोजगाराची संधी उपलब्ध होईल. परंतु त्या  अगोदर येथे अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एजन्सीची नियुक्ती करून सुरक्षितते करिता मायक्रो प्लॅनिंग होण्याची आवश्यक  आहे. बंदी घालने  येथे  होणाऱ्या दुर्घटनेला लगाम घालण्या करीता  एक उपाय योजना आहे. परंतु केवळ पोलिस बंदोबस्त ठेवून  पांडव कडा परिसरातील सुरक्षितता साधली जाणार नाही. वास्तविक पाहता खारघरच्या वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेत पोलीस ठाण्यात मनुष्यबळ कमी आहे. त्यात पांडवकडा परिसरात बंदोबस्त तैनात करावा लागतो. मात्र हे क्षेञ  अतिशय मोठे असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. वेगळ्या वाटा शोधून  ते   आतमध्ये प्रवेश करते. पोलीस बंदोबस्त सुरू होण्याच्या अगोदरच सकाळीच कित्येक जण आता मध्ये घुसतात. हे शनिवारी घडलेल्या दुर्घटनेवर उघड झाले. बेफान ,बेलगाम असलेल्या तरुण-तरुणींना अटकाव घालायचा कसा असा प्रश्न सुरक्षा यंत्रणेसमोर पडला आहे. आपला जीव धोक्यात घालून पावसाचा मनमुराद आनंद घेण्याकरीता कॉलेजचे तरुण-तरुणी पांडवकडा परिसरात येतात. कारवाईचा बडगा उगारला तरी, घुसखोरी काही केल्या थांबायला तयार नाही. ही सर्वाधिक पोलिसांची डोकेदुखी ठरणारी बाब आहे. या परिसरात धोकादायक दर्शवणारे फलक लावण्यात आले आहे. प्रसिद्धी माध्यमातूनही पांडवकडा परिसरात जाऊ नये, त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे असे वारंवार जाहीर करूनही तरुणाई मृत्यूचा कडा समजल्या जाणाऱ्या या परिसरात वावरते हीच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल . कित्येक जण महाविद्यालयाच्या नावाखाली घराच्या बाहेर पडतात. आणि अशा प्रकारे मृत्यूच्या धाडेत घुसतात. शनिवारी तीन मुलींचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेकांच्या मनामध्ये विचारांचा कल्लोळ सुरू होता. मृत मुलींच्या पालकांनी आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून या तिघींना लहानचे मोठे केले . त्यांना त्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली असणार. इतकेच नाही तर शिक्षणावर आपल्या आयुष्याची पुंजी रिकामी केली असणार. त्याचबरोबर त्या तिघींच्या करिअरचे स्वप्नही उरी बाळगले असणार. पांडवकडा परिसरात येऊन, धोकादायकरित्या त्या पाण्याच्या प्रवाहात उतरताना त्यांनी आपल्या जन्मदात्यांनी आपल्याकरता उपसलेले कष्ट का आठवले नसतील हाच सगळ्यांना पडलेला   प्रश्न आहे. पावसाळा नेहमी येईल, पांडवकडा धबधबा दरवर्षी पाण्याने वाहील, येथे पर्यटकांनी जाऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त दररोज तैनात केला जाईल. परंतु जीवानिशी गेलेल्या त्या तीन   लेकी पुन्हा परत कधीच येणार नाहीत. दररोज कॉलेजला जाण्याच्या अगोदर त्या मुलींची  घरात सुरू असलेली लगबघ त्यांच्या आई-वडिलांना, बहिण भावांना कधीच अनुभवता येणार नाही. कारण त्या मृत्यूच्या कड्यावरून वाहून गेल्या आहेत. हे वास्तव सर्वांनाच मान्य करावा लागेल.