खांदा वसाहतीतील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाची चाचपणी

सिडको अध्यक्षांनी केली भूखंडाची पाहणी
पनवेल /प्रतिनिधी: – खांदा वसाहतीत सध्या ज्या ठिकाणी फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. त्या भूखंडावर बस टर्मिनल आणि वरती पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथील फेरीवाल्यांना पर्यायी जागा तसेच त्यांच्या पुनर्वसनाची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी जागेची पाहणी करून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सिडको अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.
पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सिडको वसाहतीत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दरम्यान राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन होणे क्रमप्राप्त आहे. परंतु अनेक तांत्रिक अडचणीमुळे सिडकोने संबंधितांचे पुनर्वसन केले नाही. दरम्यान खांदा वसाहतीतील फेरीवाले सेक्टर-8  येथील  भूखंडाच्या कडेला व्यवसाय करीत आहेत. दरम्यान येथे  एका बाजूला फेरीवाल्यांचे पुनर्वसन  कायमस्वरूपी करावे अशी मागणी स्थानिक नगरसेविका सीताताई पाटील यांनी सिडकोकडे केली होती. परंतु हा भूखंड बस टर्मिनलसाठी राखीव आहे. तसेच खाली टर्मिनल्स आणि वरती इमारती असा प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया ही पूर्ण झालेल्या  आहेत. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान येथील फेरीवाल्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय कोणतेही काम सुरू होऊ देणार नाही. अशी भूमिका सीताताई पाटील यांनी घेतली आहे. त्यांनी या आशयाचे पत्र सिडकोच्या वरिष्ठांना दिले आहे. तसेच संबंधित फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत त्यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनाही साकडे घातले होते. या सर्व गोष्टींचा विचार करीत आ.ठाकूर यांनी बुधवारी खांदा वसाहतीत जाऊन फेरीवाल्यांना पर्यायी जागा, तसेच त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून मोकळ्या भूखंडाची पाहणी केली. यावेळी प्रभाग समितीचे सभापती संजय भोपी, नगरसेविका सीताताई पाटील, मोतीराम कोळी यांच्यासह स्थानिक रहिवासी, फेरीवाल्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सेक्टर 13 मधील जागेचा पर्याय
वसाहतीत सेक्टर 13 मध्ये मिनी मार्केट करिता भूखंड राखीव आहे. या ठिकाणी टपऱ्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी बहुतांशी बंद अवस्थेत आहेत. या ठिकाणी खांदा वसाहतीतील फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याकरिता पर्याय सुचवण्यात आला आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही याकरिता अंशता मान्यता दिली आहे. सिडको च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सिडको अध्यक्षांनी यावेळी सांगितले.