रिद्धिमा पाठीमागील सिडकोच्या घरांचा धोका टळला

छतावरील टाकी रस्त्याच्या बाजूला पाडण्यास यश
पनवेल /प्रतिनिधी:-कळंबोली येथील धोकादायक रिधिमा इमारतीवरील टाकी रस्त्याच्या बाजूने पाडण्यास सोमवारी यश मिळाले. त्यामुळे पाठीमागे असलेल्या सिडकोच्या घरांवरील धोका टळला आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत अर्धे काम पूर्ण झाले असल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. मंगळवार पर्यंत पूर्ण इमारत जमीन दोस्त करण्याचे यश येईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
कळंबोलीतील अग्निशमन दलाच्या  रोडवर असलेली रिधिमा इमारत धोकादायक अवस्थेत गेल्या अनेक वर्षापासून आहे.2011 पासून ही बिल्डिंग मोकळी असून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान बुधवार आणि गुरुवारी रिधिमा चा काही भाग खाली कोसळला. विशेष म्हणजे त्यावेळी महापालिका उपायुक्त जमीर लेंगरे कर हेशिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह  इतरांबरोबर मोडकळीस आलेल्या या  इमारतींची पाहणी करीत  होते. दरम्यान हे बांधकाम कोणी तोडायचे याबाबत चर्चा करता करता तीन ते चार दिवस उलटले. शेवटी सोसायटीने ही इमारत जमीनदोस्त करण्याकरिता पुणे येथून मशिनरी मागवल्या. रविवारी सायंकाळी चार वाजता कामाला सुरुवात झाली. परंतु पाठीमागे असलेल्या सिडकोच्या घरांच्या सुरक्षिततेचे काय असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. त्यामुळे काम थांबवण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा हातोडा मारण्यास सुरुवात झाली. दरम्यान इमारतीवर असलेली पाण्याची टाकी रोडच्या बाजूला पाडण्यात आली. सायंकाळपर्यंत जवळपास अर्धे काम पूर्ण झाले असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूने रस्ता बंद ठेवण्यात आला होता. तसेच पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
अभियंता राहुल जाधव यांची सूचना कामी आली.
दरम्यान रिधिमा इमारतीच्या टेरेसवर जवळपास पन्नास हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी होती. भीतीदायक गोष्ट म्हणजे ही पाण्याची टाकी सिडकोच्या घरांच्या बाजूला होती. त्यामुळे ती तोडत असताना पाडकाम साहित्य बाजूच्या घरांवर जाण्याची मोठी भीती होती. परंतु राहुल जाधव यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कटर मशीनच्या ऑपरेटर ने टाकी चा भाग रस्त्याच्या बाजूने ओढला. जाधव यांच्या सूचनेनुसार ऑपरेटरने टाकीचे पाडकाम केल्याने मोठा धोका टळला. त्यामुळे रिधिमा सोसायटीचे सदस्य, स्थानिक नगरसेवक, महापालिका आणि पोलिस यंत्रणा आणि सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी प्रभाग अधिकारी हरिश्चंद्र कडू उपस्थित होते.