स्वागत… पाठिंबा अन आर्थिक मदत

निलेश लंके यांचा जनसंवाद यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद
पारनेर -नगर विधानसभा मतदारसंघात घड्याळाची टिकटिक
पारनेर/ प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार निलेश लंके यांनी मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली आहे.6 ऑगस्टपासून सुरू झालेल्या यात्रेचे गावागावांमध्ये स्वागत होत आहे. त्याचबरोबर लंके यांना तर पाठिंबा दिला जात आहेच. त्याचबरोबर आर्थिक मदत केली जात आहे. आतापर्यंत दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक हातभार जमा झाला आहे. त्यामुळे येथे लंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठे आव्हान निर्माण केले आहे.
पारनेर नगर हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रतिष्ठेचा केला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी गेल्या तीन टर्म पासून येथे नेतृत्व करीत आहेत. औटी यांचे  एकेकाळचे सहकारी निलेश लंके यांनी या वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ आपल्या मनगटात बांधले. सत्तर हजारांपेक्षा जास्त महिलांना मोहटा देवी दर्शन, लाखोंच्या संख्येचे कृषी प्रदर्शन, भव्यदिव्य रोजगार मेळावा, मुंबईस्थित पारनेर- नगरकरांचा लक्षवेधी मेळावा याव्यतिरिक्त ठिकाणी असलेला दांडगा जनसंपर्क, या सर्व गोष्टी निलेश लंके यांच्या जमेच्या बाजु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी प्रवेश केला होता. एकंदरीतच त्यांच्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक असलेल्या लंके  यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी संपूर्ण मतदारसंघात जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे.21 ऑगस्ट पर्यंत निलेश लंके 160 पेक्षा जास्त गावांना भेटी देणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पंचायत समिती गणांमध्ये ते मुक्काम करीत आहेत. निघोज येथून सुरू झालेल्या या जनसंवाद यात्रेला ठिकाणी उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ढोल ताशा, सनईचे सूर निलेश लंके यांच्या स्वागतात उमटताना  दिसत आहेत. कित्येक ठिकाणी बैलगाड्या मध्ये त्यांची मिरवणूक काढली जात आहे. गावागावात, वाडया -वस्त्यांवर तसेच शेताच्या बांधावर निलेश लंके हे संवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. प्रत्येक गावांमध्ये त्यांचे उस्फूर्तपणे स्वागत केले जात आहे. याकरीताजनसमुदाय ही मोठ्या संख्येने जमत असून “नेते तुम्हीच आमदार होणार “असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण निलेश लंके यांच्या स्वागताला हजेरी लावताना दिसत आहेत. स्वागत, पाठिंब्या बरोबरच गावागावांमध्ये लंके यांना आर्थिक मदतीचा हात दिला जात आहे.