वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांना राष्ट्रपती पदक जाहीर

कर्तव्यनिष्ठ, कार्यतत्पर, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित
पनवेल/ प्रतिनिधी: कळंबोली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.कर्तव्यनिष्ठ, कार्यतत्पर, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ते पोलीस खात्यात परिचित आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याबरोबरच गुन्हेगारीचे निर्दालन करण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला. त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. याबद्दल गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मामा एन.सी जाधव हे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर असल्याने सतीश गायकवाड यांनी पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यासाठी सहकार खात्यात नोकरीस असलेले त्यांचे  वडील दिगंबर गायकवाड यांच्याकडून पाठबळ मिळाले.1992 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. नाशिक येथे पार पडलेल्या एक वर्षाच्या प्रशिक्षणात त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला.  ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मानपाडा पोलीस ठाण्यात गायकवाड यांची नियुक्ती झाली. सुरुवातीलाच प्रगटीकरण विभागात काम करताना  सराईत गुन्हेगारांवर वचक बसवली. त्या काळात अनेकांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर डोंबिवली, कल्याण, भिवंडी या पोलिस ठाण्यात गायकवाड यांनी काम केले. येथेही अनेक  गंभीर गुन्ह्यांची उकल त्यांनी केली. कुख्यात गुंड सुरेश मंचेकर तसेच शिकलकर टोळी संपवण्याच्या मोहिमेमध्ये सतीश गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.2006 मध्ये त्यांची अति महत्वाच्या व्यक्तींच्या व्यक्तिगत सुरक्षेसाठी नियुक्ती झाली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,  माजीगृहमंत्री दिवंगत आर आर पाटील, तसेच तत्कालीन पोलीस  महासंचालक व सैन्य दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे सुरक्षा अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर नवी  मुंबई पोलीस आयुक्तालयात त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून वाहतूक शाखेत काम केले.2010 ला सतीश गायकवाड पोलीस निरीक्षक झाले. सेंटर पोलीस स्टेशन येथे काम करीत असताना रेल्वेत घडणाऱ्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची अतिशय शिताफीने उकल करण्यास त्यांना यश मिळाले. भक्कम पुरावे जमा केल्याने अनेक गुन्हेगारांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली.2012 साली सतीश गायकवाड यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.2014 ला  त्यांची नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात बदली झाली. तीन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक गुंडांना तडीपार करून, गरीब गरजू व्यक्तींची फसवणूक करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला. त्याचबरोबर पोलीस आणि जनता यांच्यातील समन्वय आणि संवादही त्यांनी वाढवला. 2017 – 18 या कालावधीत वाशी वाहतूक शाखेचे ते प्रभारी अधिकारी होते. येथेही चमकदार  कामगिरी केली. त्यांनी आपल्या कार्यकाळात 90 लाख रुपयांचा महसूल शासन दरबारी जमा केला.12 डिसेंबर 2018 पासून सतीश गायकवाड कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी कळंबोलीतील गुन्हेगारी मोडीत  काढण्याकरीता प्रयत्न केले . कायदा आणि सुव्यवस्था राखताना गर्दुल्ले, मद्यपी व धूम्रपान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली.त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर ,पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्यासह इतरांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक
सतीश गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे.