ड्रेनेजलाही भरले सलाईन

रूग्णालयांने इंजेक्शन सुध्दा दिले   

पनवेल शहरातील धक्कादायक प्रकार

पनवेल/प्रतिनिधी- शहरातील लाईन आळीमध्ये मलनिःसारण वाहिनी तुंबल्याने मोठया प्रमाणात पाणी रस्त्यावर येत आहे . वारंवार तक्रारी केल्यानंतर महापालिकेच्या सफाई कामगारांनी साफसफाई केली. त्यावेळी आतमध्ये सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शनचे सिरिन, रक्ताचे नमुणे घेण्यासाठी वापरण्यात येणारे कंटेनर, हॅँडग्लोज  आढळून आले. तसेच उपहारगृहाचा टाकाऊ कचरा आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.संबधितावर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.  

शिवाजी रोडलगत रूग्णालय, स्वीट होम आणि उपहारगृह आहे. त्यापैकी काही जण आपला कचरा ड्रेनेजमध्ये टाकतात. विशेष करून उपहारगृह आणि स्वीट होम वाले उरलेले खादय पदार्थ  ड्रेनजमध्ये टाकत असल्याने मलनिःसारण वाहिनी तुंबते. या कारणाने  महापालिकेच्या व्यापारी संकुलासमोरील चेंबरमधून गेल्या काही दिवसापासून सांडपाणी  बाहेर वाहत होते. यामुळे आजुबाजुचे रहिवाशी तसेच दुकानदारांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही पनवेल महानगपालिकेकडून संबधितांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. दरम्यान शुक्रवारी सफाई कामगारांनी हा चेंबर साफ केला. त्यावेळी उपहारगृहाचा कचरा त्यातून बाहेर निघाला. त्याचबरोबर धक्कादायक बाब म्हणजे आतमध्ये सलाईनच्या बाटल्या, सिरीन, हॅँडग्लोज तसेच रक्ताचे नमुणे तपासणी कंटेनर सुध्दा आढळून आले. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. बाजूलाच असलेल्या रूग्णालयाला विचारना केली असता हे  साहित्य आमचे नाहीच असे उत्तर त्यांच्याकडून मिळाले. मग हे बायोमेडिकल वेस्ट आले कुठून असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.