दगडफोड्याच्या पोराची पोलीस दलात अफलातून झेप ……

जिद्दीने परिस्थितीवर मात करत पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत मजल

सोलापूर

ही कथा आहे सुमारे 15 वर्षे माळरानावर रणरणत्या उन्हात काळ्या पाषाणावर सुतकीचे घाव घालत मोठ्या जिद्दीने मुलाला घडवणाऱ्या दगडफोड्या बापाची आणि त्या जिद्दीला ही गुडघे टेकून सल्यूट ठोकायला लावणाऱ्या, अवघ्या वयाच्या चोविसाव्या वर्षी राज्यसेवा परीक्षेत एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळा जिद्दीच्या कमानीतून एकापाठोपाठ एक सपासप तीर सोडणाऱ्या जिगरबाज धडपड्या तरुणाची. पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब मारुती जाधव असे त्याचे नाव..

बार्शी जिल्हा सोलापूर येथील शे-पाचशे लोकवस्ती असलेल्या सर्जापूर च्या झोपडपट्टीत राहणाऱ्या सरस्वती व मारुती जाधव या दांपत्याचा थोरला मुलगा आप्पासाहेब ज्याच्या नावातच जन्मत:च साहेब हे बिरुद लागलं होतं. ते त्यांना सिद्ध करून दाखवलं. मागील सहा महिन्यापूर्वीच त्याने पुणे ग्रामीण, सासवड येथील पोलीस उपाधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली. अख्खी हयात दगडधोंडे फोडण्यात घालवलेल्या बापाचं कष्टाचं शेवटी त्यांनी सोनं करून दाखवलं आहे.