पारनेरकरांनी जनसंवाद यात्रा घेतली डोक्यावर

निलेश लंके यांचे गावोगावी  जंगी स्वागत
पारनेर/ प्रतिनिधी :-आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार निलेश लंके यांनी जनसंवाद यात्रा काढली आहे.  ही यात्र पारनेरकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. लंके यांची गावागावात खांद्यावर, बैलगाडी, सजवलेला रथ आणि घोड्यावर मिरवणूक काढण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी जंगी स्वागतही करण्यात येत आहे.
एकेकाळी भाकप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पारनेरमध्ये सलग तीन वेळा सेनेचा भगवा फडकला आहे. याठिकाणी विजयाचा चौकार मारण्याकरीता विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी तयारीत आहेत. मात्र त्यांना त्यांच्याच पक्षातून राष्ट्रवादीत गेलेल्या निलेश लंके यांनी आव्हान दिले आहे. जानेवारी महिना लंके यांनी आपल्या हातात घड्याळ बांधले. आणि तेव्हापासूनच एक प्रकारे विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यांची लोकप्रियता, तरुणांची असलेली फळी, जनसामान्यांची केलेली विविध कामे, त्याचबरोबर कृषी प्रदर्शन, रोजगार मेळावा, महिलांना मोहटा देवीचे दर्शन, संजीव गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी करीता केलेले उपोषण, चारा छावण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर झालेले आंदोलन, याव्यतिरिक्त मुंबईस्थित पारनेरकरांवर असलेला प्रभाव या सर्व जमेच्या बाजू पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने निलेश लंके यांना उमेदवारी निश्चित केली आहे. दरम्यान त्यांनी 6 ऑगस्टपासून पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू केले आहे. या माध्यमातून ते प्रत्येक गावाला भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या अडीअडचणी तसेच समस्याही जाणून घेत आहेत. दरम्यान गेल्या बारा दिवसापासून सुरू असलेल्या या जनसंवाद  यात्रेला पारनेरकरांकडून   उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक गावात निलेश लंके यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. यानिमित्ताने कित्येक गावांमध्ये मतभेद विसरून लंके यांना आमदार करण्याचा संकल्प जाहीरपणे बोलून  दाखवला जात आहे. त्याचबरोबर  सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असल्याने त्यांना आतापर्यंत तीन कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. लंके यांच्या जनसंवाद यात्रेमुळे त्या गावांमध्ये तरुणांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. त्याचबरोबर लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक त्यांच्या स्वागताला हजेरी लावत आहेत. प्रत्येक गावाच्या वेशीवर निलेश लंके यांना खांद्यावर घेऊन तरुण मंडळी ढोल-ताशाच्या सुरत ताल धरताना दिसत आहेत.
काठी टेकवत… व्हिल चेअर वरुन निलेश लंके यांचे स्वागत
दरम्यान वयोवृद्ध मंडळी  काठी टेकवत टेकवत निलेश लंके यांचे व जनसंवाद यात्रेचे स्वागत करताना दृष्टिक्षेपात पडत आहेत. इतकेच नाही तर काही अपंग मंडळी व्हील चेअरवर येऊन संवाद यात्रेत सहभागी होत आहेत.
आजी माजी सैनिकांकडून प्रतिसाद
दरम्यान पारनेर तालुक्यातील अनेक तरुण भारतीय सैन्यात काम करीत आहेत. शनिवारी रायतळे येथे जनसंवाद यात्रा गेली असता. याठिकाणी तीन भारतीय सैनिकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जनसंवाद यात्रेचे स्वागत केले. त्याठिकाणी रक्षाबंधन सुद्धा करण्यात आले. त्याचबरोबर अस्तगाव येथेही  गावातील माजी सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.