वंदना बामणे यांच्या ‘सामाजिक सेवेचा’ गौरव

वैद्यकीय समिती व भगवती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सन्मानित
पनवेल प्रतिनिधी: – कळंबोली येथील सामाजिक कार्यकर्त्या वंदना तानाजी बामणे यांना एआयएसएफ वैद्यकीय समिती व भगवती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आदर्श समाजसेविका महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद येथे समारंभपूर्वक पुरस्कार बामणे यांना प्रदान करण्यात आला.

गेल्या दीड दशकांपासून जास्त काळ वंदना तानाजी बामणे या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. महिला दक्षता कमिटी मध्ये काम करीत असताना त्यांनी महिलांचे कौटुंबिक कलह, तंटे सोडवले आहेत. अनेकांचे संसार तूटन्यापासून वाचवले आहेत. त्याचबरोबर अन्याय अत्याचाराविरोधात आवाजही उठवला आहे.बेटी बचाव बेटी पढाव याकरिता ही भरीव योगदान आहे. गोरगरिबांचा मदतीला धावून जाणार्‍या वंदना तानाजी बामणे या प्राणीप्रेमी म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या घरात मांजर आणि कुत्र्यांना आश्रय दिला. त्यांच्यावर जिवापाड प्रेम करून समाजासमोर एक वेगळा वस्तुपाठ ठेवला. अतिशय संवेदनशील, सामाजिक जाण आणि भान असलेल्या या रणरागिनीचा याअगोदर विविध सामाजिक संस्थांनी गौरव केला आहे. रायगड जिल्ह्यातील चर्मकारांच्या विविध समस्या आणि अडचणींची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून त्या शासकीय पातळीवर पाठपुरावा करीत आहेत. एकंदरीतच त्यांच्या कार्याची दखल घेत वैद्यकीय समिती व भगवती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने नुकतेच बामणे यांना सन्मानित केले. यावेळी एआय एसएफ वैद्यकीय समितीचे राज्याध्यक्ष डॉ. अमोल जाधव भगवती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या राज्याध्या  सविता संकपाळ, पुष्पा मुळे उपस्थित होते.