राष्ट्रवादीच्या व्हीजेएनटी सेलच्या पनवेल जिल्हाध्यक्षांनी पारनेर करांना जिंकले

निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेत केले ग्रामस्थांना आवाहन
पारनेर/ प्रतिनिधी: – पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा सुरू आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्हीजेएनटी सेलचे पनवेल जिल्हाध्यक्ष आनंद भंडारी यांनी हजेरी लावत पारनेर करांना भावनिक साद घालत निलेश लंके यांना आमदार करण्याचे आवाहन केले.
पनवेल परिसरात मूळ पारनेरकर मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे निलेश लंके यांचा पनवेलला दांडगा जनसंपर्क आहे. राष्ट्रवादी व्हीजेएनटी सेलचे पनवेल जिल्हाध्यक्ष आनंद भंडारी यांच्याशी त्यांचे मैत्रीत्वाचे  संबंध आहेत. तीन महिन्यापुर्वी  पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत लंके आणि भंडारी यांनी पार्थ अजित पवार यांचा पनवेल विधानसभा मतदारसंघात एकत्रित प्रचार केला. दरम्यान पारनेर नगर विधानसभा मतदार संघातून निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मतदार संघात 6 ऑगस्टपासून जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत शनिवारी आनंद भंडारी सहभागी झाले. त्यांनी वाळवणे, रायतळे, अस्तगाव, रांजणगाव, पिंपरी गवळी, वाघुंडे या गावांना जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने भेटी दिल्या. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये भंडारी यांनी आपल्या खास शैलीत भाषण केले. त्यांनी लंके यांच्या कामाचे, तसेच त्यांची,सर्वसामान्यांकरीता  असलेली तळमळ आणि संवेदनशीलतेचं कौतुक केले. भविष्यात पारनेर नगरचा कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून लंके यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा असे आवाहनही भंडारी यांनी केले. जनसंवाद यात्रेसाठी थेट पनवेलहून पारनेरला आलेल्या राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्याने  येथील ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने जिंकून घेतले.