आठरा दिवस फिरलो पण विकास कुठे सापडला नाही

निलेश लंके यांचे जनसंवाद यात्रा समारोपात घणाघाती भाषण
अहमदनगर /प्रतिनिधी: – जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने मी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात 18 दिवस फिरलो. मात्र मला कुठेही विकास सापडला नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते निलेश लंके यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय राव औटी यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. आरणगाव येथे पार पडलेल्या समारोप सभेत त्यांनी घणाघाती भाषण केले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, घनश्याम शेलार ,माजी महापौर अभिषेक कळमकर,
यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निघोज हे माझे मूळ गाव असल्याने येथून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ केला. आणि माझे जन्मगाव असलेल्या आरणगावात सांगता समारंभ आयोजित केला असल्याचे लंके म्हणाले.
जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने माझे प्रत्येक गावांमध्ये स्वागत करण्यात आले. ही याञा पारनेर नगरकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. रोजंदारी करणाऱ्या माता  बहिणींनी मला आपल्या  एक दिवसाचा रोजगाराचे पैसे दिले. त्यांनी त्यांच्या  घामाचा पैसा देऊन मला पाठबळ दिले. त्यांचा प्रत्येक घामाचा एकही थेंब मी वाया जाऊ देणार नाही अशी काही ग्वाही निलेश लंके यांनी  उपस्थितांना दिली. मला जनसंवाद  यात्रेत अनेकांनी मदत दिली. याबाबतही विरोधकांनी ईडीची चौकशी करण्याची भाषा केली. आपण फकीर असून बँकेत साधे खाते सुद्धा नाही. लावा काय चौकशी लावायची असे जाहीर आव्हान त्यांनी सभेतून विरोधकांना दिले. गेल्यावर्षी नवरात्रीत 72हजार  महिलांना मोहटा देवीचे दर्शन घडवून आणले. त्यावेळीही काही मंडळींनी इतका पैसा आला कुठून असाच सवाल उपस्थित केला होता. त्यांचाही निलेश लंके यांनी जनसंवाद यात्रेच्या सांगता सभेमध्ये खरपूस समाचार घेतला. पारनेर नगर मध्ये 70 ते 75 टक्के तरुण बेरोजगार आहेत. याठिकाणी शिक्षणाच्या  सुविधांचा अभाव आहे. पाण्याचा प्रश्न  बिकट आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचेही लंके यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधीने पंचतारांकित एमआयडीसी ला विरोध केला
नगर तालुक्यातील घोसपुरी येथे पंचतारांकित एमआयडीसी येणार होती. परंतु येथील लोकप्रतिनिधीने  विकासाला विरोध केला असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला. त्या पार्श्वभूमीवर देऊळगाव सिद्धी येथे कार्गो चा प्रकल्प होणार होता. तोही झाला नाही. त्यामुळे या भागातील तरुण बेरोजगार राहिले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आबालवृद्धांच्या मदतीमुळे निलेश लंके झाले भावूक 
जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने निलेश लंके यांना जवळपास पावणेतीन कोटी रुपयांची मदत गावकऱ्यांनी केली. जनतेकडून मिळालेल्या प्रेमामुळे लंके भावुक झाले. एका लहान मुलाने खाऊ करीता साठवलेले पैसे निलेश लंके यांना दिले. गारगुंडी येथील दोन्ही पायांनी अपंग असलेल्या त्रिंबक झावरे , तसेच 85 वर्षाच्या एका आजीने आपल्या हाताला घरीच इलाज करून औषधाचे पैसे वाचवले आणि ते लंके यांना दिले. मदतीचे हे क्षण  कथन करीत असताना सभा अक्षरशः गंभीर झाली.