‘गणेशोत्सवा’ च्या निर्विघ्नं प्रवासाकरिता पोलीस सज्ज

400 पेक्षा जास्त पोलिसांची कुमक तयार
अलिबाग /प्रतिनिधी :-गणेशोत्सवा करिता कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न व्हावा याकरता रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. यासाठी 400 पेक्षा जास्त मनुष्यबळ बंदोबस्त करतात तयार आहेत.गणेशोत्सवासाठी सर्व उपाययोजना करण्यात आले आहे.
 मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, पुणे येथे नोकरी-व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणात मूळ कोकणवासी स्थायिक झाले आहेत. गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असल्याने अनेक जण
 रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील आपल्या मूळ गावी जातात. त्यांना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 तसेच पालीफाटा (खोपोली) वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 (ए) येथून जावे लागते. या मार्गावर गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलामार्फत खबरदारी घेतली जाते. यावेळी वाहतुकीचे नियमन व नियंत्रण सुलभ व्हावे म्हणून वाहतूक बंदोबस्ताची नियोजनबद्ध आखणी करण्यात आली आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक  अनिल पारस्कर व  अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 06 उप विभागीय पोलीस अधिकारी, 13 पोलीस निरीक्षक, 20 सहा.पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक तसेच 384 पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. 10 वाहतूक मदत केंदावर क्रेन, रूग्णवाहिका  तयार ठेवण्यात येणार आहेत. या माध्यमातून नादुरुस्त वाहने तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत ठेवली जाणार आहे. तसेच महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी बॅरीकेटिंग करण्यात आले आहे. गणेश भक्तांचा मार्ग सुखकर व्हावा म्हणून ठिक-ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत.
 गणेश भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून 100 स्वयंसेवक  नेमण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच रात्रौ गस्तीकरिता असणा-या पोलीस कर्मचा-यांस रिफ्लेक्टर जॅकेटस, लीडबॅटनर्स व बंदोबस्ताकरिता असलेल्या सर्व पोलीस कर्मचा-यास रेनकोटचे वाटप करण्यात आलेले आहे. गणेश भक्तांसाठी रायगड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष. 02141/228473, 7447711110 व जिल्हा वाहतूक शाखा  02141/220015 हे क्रमांक कार्यरत असतील.