अखेर उस्मानाबादच्या राणा दादांचे ठरले

कमळ हातात घेण्याची अधिकृत घोषणा
उस्मानाबाद/ प्रतिनिधी: – गेल्या अनेक दिवसापासून राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. परंतु शनिवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उस्मानाबादच्या या राणा दादांनी मनगटातील राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून हातात कमळ घेण्याचा निर्णय घेतला. उपस्थितांनी “राणा दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है! “जिथे तुम्ही तिथे आम्ही” अशा घोषणा देत महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. यावेळी माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील सुद्धा उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून डॉ .पद्मसिंह पाटील हे शरद पवारांसोबत होते. पाटील हे अजित पवार यांचे मेहुणे आहेत. दरम्यान राणा जगजिसिंह पाटील भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू होती. शुक्रवारी यासंदर्भात श्रीरामपूर येथे पत्रकारांनी विचारल्यानंतर शरद पवार संबंधितावर चिडले होते. दरम्यान मला तुमच्याशी काही बोलायचं आहे! असा संदेश देत राणाजगजितसिंह यांनी शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला होता. यावेळी त्यांनी गेल्या वीस वर्षात उस्मानाबादला पाणी आणता आले नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक मदत प्राप्त झाली नाही. सहकारी साखर कारखाना ऊर्जितावस्था देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या भागात उद्योगधंदे आणून येथील तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प बोलून दाखवला. याकरीता भारतीय जनता पक्षाशी पर्याय नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सबका साथ सबका विकासा हे बिद्र वाक्य घेवून  नव भारताची निर्मिती होत आहे. त्यामध्ये आपण का  सहभागी होऊ नये असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाकरीता आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. तुम्ही  मला साथ देणार की नाही अशी विचारणा त्यांनी उपस्थितांना करताच आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही जिथे तिथे आम्ही असे सांगत कार्यकर्त्यांनी या निर्णयाला पाठबळ दिले.
माझी अवस्था महाभारतातल्या अर्जुनासारखी 
गेल्या वीस वर्षात अनेक संकट आले, आपण चक्रव्यूहात सापडला परंतु ते भेदून संकटांवर मात केली. आज माझी अवस्था महाभारतातल्या अर्जुना सारखी झाली आहे. तुम्ही सर्वजण माझ्याकरता श्रीकृष्ण आहात तेव्हा तुम्हीच मला मार्ग दाखवा अशी भावनिक साद राणा जगजितसिंह पाटील यांनी उपस्थितांना घातली.
शरद पवार आमचे आदर्श आणि दैवत
हा निर्णय आपल्यासाठी अतिशय कठीण आहे. शरद पवार हे आपले आदर्श आणि दैवत आहेत. त्यांच्याबद्दलची अस्था व  श्रद्धा कणभरही कमी होणार नाही. असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.